Pune: भरधाव डंपरचे चाक फुटल्याने अपघात; दोन शाळकरी मुले गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 11:59 AM2021-11-27T11:59:53+5:302021-11-27T12:04:41+5:30
या अपघातात दोन मुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...
येरवडा: डंपरचे चाक फुटून खराडी (kharadi) येथे झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात देवांश चव्हाण (वय 15, रा. मोजेसवाडी वडगावशेरी) व प्रथमेश देसाई (वय 15, रा. विश्रांतवाडी पुणे) हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चालकाविरुद्ध बेदरकारपणे डंपर चालवून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवांश व प्रथमेश हे दोघेही खराडी येथील निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल या शाळेत नवव्या इयत्तेत शिकतात. शाळा सुटल्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास चालत बसस्टॉपकडे जात असताना रेडिसन हॉटेलच्या मागील बाजूस असणाऱ्या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारा डंपर क्रमांक (एम एच- 12, क्यूजी -38 67) याचे मागील बाजूस असलेले चाक अचानक फुटले. शेजारी रस्त्यावरून चाललेल्या देवांश व प्रथमेश यांना फुटलेल्या चाकातील अचानक वेगाने आलेल्या हवेमुळे दोघेही खाली कोसळले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी अपघात करणाऱ्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक शिसाळ करीत आहेत.