येरवडा रुग्णालयातील दोन जणांचे पुणे जिल्हा विधी सेवेकडून पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 07:29 PM2019-02-16T19:29:44+5:302019-02-16T19:33:58+5:30
ते सध्या पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावरील एका हॉटेलमध्ये काम करीत आहेत.
पुणे : अनेकदा मानसिक आजारातून पूर्णपणे सावरल्यानंतर देखील त्या व्यक्तींना रोजगार मिळविण्याकरिता अडचणींचा सामना करावा लागतो. कुठलाही प्रकारचे काम मिळण्यास समस्या येतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून येरवडा रुग्णालयात असलेल्या दोन जणांचे पुनर्वसन करण्यात पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला यश आले आहे. ते सध्या पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावरील एका हॉटेलमध्ये काम करीत आहेत.
मनोरुग्णालयात नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांना हॉटेल चालकाकडे सोपविण्यात आले. दोन वेळचे जेवण आणि 8 हजार रुपये असा मासिक भत्ता त्यांना देण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी ए. डी. पळसपगार, प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत आणि मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यावेळी उपस्थित होते.
उपचारातून बरे झालेल्या 25 व्यक्ती मनोरुग्णालयात आहेत. मात्र या त्या ब-या झाल्यानंतर त्यांना पुन्हा घरी घेवून जावे लागू नये म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी खोटे पत्ते दिले आहेत. तर ज्या कुटुंबीयांना फोन करण्यात आले ते एकतर फोन घेत नाहीत किंवा नंबर चुकीचा असल्याचे सांगतात. त्यामुळे या व्यक्ती ब-या झाल्यानंतर देखील अनेक वर्ष याच ठिकाणी आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून त्यातील दोघांना नोकरी देण्यात आली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
रुग्णांना बरे झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यांचे पालकत्व स्वीकारण्यास तयार असलेल्या व्यक्तींकडे त्यांना सुपूर्त करण्याबाबत न्यायालय आदेश देते. त्यानंतर पालकत्व स्विकारणा-या व्यक्तीकडून करारपत्र घेतल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करण्यात येते. नोकरी करीत असताना त्यांना काही त्रास झाल्यास मदत करण्याच्या सूचना संबंधित पोलिस ठाण्यास देण्यात आल्या आहेत. तसेच गरज पडल्यास त्यांच्यावर पुन्हा उपचार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी अँड. अतुल गुंजाळ आणि अँड. मिलिंद पवार यांनी मदत केली.