येरवडा कारागृहातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 13:10 IST2022-07-09T13:08:41+5:302022-07-09T13:10:30+5:30
या कैद्याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून केला होता खून...

येरवडा कारागृहातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे :येरवडा कारागृहातील पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणात एका कैद्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सचिन मधुकर नरवाडे (वय ३१, रा. तांबे बिल्डींग, बजरंगवाडी, शिक्रापूर, मूळ रा. सावंगी, ता. भोकरदन, जि. जालना) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. २ जून रोजी शिक्रापूर परिसरातील बजरंगवाडीत सचिनने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केला होता. या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सचिनला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने सचिनची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
गुरुवारी (७ जुलै) दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयीन बंद्यांना मोकळे सोडण्यात आले होते. अर्ध्या तासानंतर कैद्यांची मोजणी करण्यात आली. त्यावेळी सचिन आढळून आले नाही. सचिनने बराक क्रमांक दोनच्या परिसरातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सचिनने चादर झाडाला बांधून आत्महत्या केल्याचे आढळून आले, असे येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे यांनी सांगितले.