येरवडा कारागृह देतंय कैद्यांच्या हाताला काम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 06:44 PM2018-08-21T18:44:10+5:302018-08-21T18:45:51+5:30
येरवडा कारागृहामध्ये कैद्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून त्यांनी तयार केलेल्या वस्तू रक्षाबंधन मेळाव्याच्या निमित्ताने विक्रीस ठेवण्यात अाल्या अाहेत.
पुणे : रागाच्या भरात किंवा अनावधानाने हातून एखादा गुन्हा घडताे. एक चूक कुटुंबाची वाताहात करते. अायुष्यातील माेठा काळ कैदी तुरुंगात घालवतात. तुरुंगात असताना या कैद्यांना काम मिळावे, ते केवळ बसून राहू नयेत. तसेच तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांचे पुनर्वसन व्हावे या हेतून येरवडा कारागृह प्रशासन विविध उपक्रम राबवत असते. या उपक्रमांच्या माध्यमातून कैद्यांकडून विविध उपयाेगी वस्तू तयार करण्यात येतात. खास रक्षाबंधनानिमित्त कैद्यांकडून कारागृह प्रशासनाने राख्या बनवून घेतल्या असून रक्षाबंधन मेळाव्याचे अायाेजन करण्यात अाले अाहे. या मेळाव्याचे उद्घाटन पुण्याचे पाेलिस अायुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात अाले. यावेळी येरवडा कारागृह अधिक्षक यु. टी. पवार उपस्थित हाेते.
कैदी हा सुद्धा एक माणूस अाहे असा विचार करुन कारागृह प्रशासनातर्फे त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात. कारागृह प्रशासनाकडून कैद्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यांच्याकडून विविध वस्तू, पदार्थ तयार केले जातात. कारागृहाचे एक विक्री केंद्र सुद्धा असून तेथे या वस्तू नागरिकांना खरेदीसाठी उपलब्ध करुन दिल्या जातात. राखीपाेर्णिमेनिमित्त खास राख्या कैद्यांनी तयार केल्या अाहेत. राख्यांबराेबरच 172 वेगवेगळ्याप्रकारच्या वस्तू कारागृहातील कैद्यांकडून तयार केल्या जातात. शिवणकाम, सुतारकाम, विणकाम, बेकरी असे विविध विभाग कारागृहामध्ये तयार करण्यात अाले अाहेत. शाेभेच्या वस्तू, फर्निचर, देवारे, कपडे, चाॅकलेट, बेकरीचे पदार्थ, कापडी पिशव्या, चादर, साड्या, बॅग, बूट, चपला, पट्टे असे चांगल्या प्रतीच्या वस्तू या विक्री केंद्रात उपलब्ध अाहेत. त्याचबराेबर कपड्यांना इस्त्री, तसेच वाहने सुद्धा कैद्यांमार्फत धुवून दिली जातात.
रक्षाबंधन मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी व्यंकटेशम म्हणाले, कारागृह प्रशासनाकडून हा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत अाहे. कैद्यांना देण्यात येणाऱ्या कामामुळे त्यांचे मनपरिवर्तन हाेण्यास मदत हाेते. या परिवर्तनाच्या माध्यमातून या वस्तू तयार करण्यात येत अाहेत. त्याचबराेबर कैद्यांना त्यांचे पुढील अायुष्य चांगल्या पद्धतीने घालविण्यासाठी ही एक चांगली संधी अाहे.
पवार म्हणाले, दरवर्षी दिवाळी मेळावा अामच्याकडे भरवला जाताे. यंदापासून रक्षाबंधन मेळावासुद्धा अाम्ही सुरु केला अाहे. या रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बराेबरच कैद्यांनी तयार केलेल्या इतर वस्तूही नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध व्हाव्यात या हेतून हा रक्षाबंधन मेळावा अायाेजित करण्यात अाला अाहे. राख्या या महिला अाणि पुरुष कैद्यांनी तयार केल्या अाहेत. या वस्तू तयार करताना कैद्यांनाही अानंद हाेत असताे. त्यांना वस्तू बनविण्याचा पगारही प्रशासनाकडून देण्यात येत असताे. या उपक्रमांच्या माध्यमातून कैद्यांच्या पुनर्वसनात चांगले पाऊल पडत अाहे.