आहुजाचा मित्र ओसवालचे पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह; म्हणे, ‘माझा काही संबंध नाही…’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 17:45 IST2025-03-09T17:43:41+5:302025-03-09T17:45:50+5:30
“मी गाडीत बसलो होतो, माझा काही संबंध नाही” भाग्येश ओसवालची भूमिका

आहुजाचा मित्र ओसवालचे पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह; म्हणे, ‘माझा काही संबंध नाही…’
पुणे : येरवडा चौकात मद्यधुंद अवस्थेत लक्झरी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणि सिग्नलवरच लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजा प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.
गौरव आहुजा याने लोकांना अडथळा निर्माण करत लघुशंका केली, तसेच नागरिकांनी जाब विचारल्यानंतर त्यांच्याकडे अश्लील चाळे करत अनैतिक वर्तन केले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गौरव आहुजाच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि गौरवचा मित्र भाग्येश ओसवाललाही पोलिसांनी अटक केली.
“मी गाडीत बसलो होतो, माझा काही संबंध नाही” – भाग्येश ओसवालची भूमिका
भाग्येश ओसवाल याच्या वकिलाने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच, पोलिस चौकशीत भाग्येशने स्वतःची बाजू मांडली आहे. त्याने सांगितले की,
“मी फक्त गाडीत बसलो होतो. मी लघुशंका केली नाही. मी गाडी चालवत नव्हतो आणि खाली देखील उतरलो नाही. मी स्वतः पोलिसांसमोर काल हजर झालो. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.”
भाग्येशच्या वकिलांनीही न्यायालयात “पोलिसांनी आधी एक कलम लावले आणि नंतर वेगळे कलम लावले. मला कोणत्या आधारावर या प्रकरणात गोवले गेले?” असा सवाल केला. तसेच, जामिनासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती दिली.
गाडीत दारूची बाटली आणि पोलीस ठाण्यात बर्गर-कोल्ड कॉफीची मागणी
पोलिस तपासात भाग्येश ओसवाल गाडीत दारूची बाटली घेऊन बसल्याचे समोर आले आहे. त्याच्या मित्रांनी पोलीस ठाण्यात त्याच्यासाठी बर्गर आणि कोल्ड कॉफीचे पार्सल आणल्याचेही उघड झाले आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांची प्रतिक्रिया
“काल सकाळी 7.30 वाजता शास्त्रीनगर भागात तरुणाकडून अश्लील वर्तन केले गेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल भाग्येश ओसवाल याला अटक करण्यात आली. मुख्य आरोपी गौरव आहुजा याला सातारा येथून ताब्यात घेतले आहे. या दोघांनाही पुण्यात अटक करण्यात आली असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय प्राथमिक अहवाल आमच्याकडे आला आहे. पुढील तपास सुरू आहे.” यासोबतच त्यांनी आरोपींना बाहेरचे खाद्यपदार्थ दिले जाणार नाही, कायद्यानुसार ठरवलेला भत्ता आणि सुविधा यांनाच परवानगी असेल, असेही स्पष्ट केले.
पुढे काय?
या प्रकरणात गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवाल यांना न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात येणार आहे. त्यांना जामीन मिळतो की पोलीस कोठडी वाढवली जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी ७ दिवसांची कोठडी मागितली असली तरी न्यायालयाने फक्त १ दिवसाची कोठडी मंजूर केली आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.