धक्कादायक! येरवड्यात अंगावर रॉकेल ओतून पतीलाच पेटवून दिले; पत्नीसह दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2023 21:55 IST2023-07-26T21:52:41+5:302023-07-26T21:55:20+5:30
मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

धक्कादायक! येरवड्यात अंगावर रॉकेल ओतून पतीलाच पेटवून दिले; पत्नीसह दोघांवर गुन्हा दाखल
किरण शिंदे: पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या शाळेतील ऍडमिशन वरून वाद झाल्याने पत्नीने पतीला चक्क जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पती 50% भाजला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
मुकेश सुरेश राजपूत (वय 42, रा. येरवडा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी उज्वला दत्तात्रय कांबळे (वय 44) हिला अटक केली आहे. तर, तिच्या एका 55 वर्षीय नातेवाईकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
येरवडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उज्वला आणि जखमी मुकेश हे पती-पत्नी आहेत. उज्वला ही जखमी मुकेश यांची दुसरी पत्नी आहे. या दोघांना पाच वर्षाची मुलगी आहे. या मुलीचा शाळेत प्रवेश घेण्यावरून आणि शाळेतील प्रवेश शुल्कावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद होते. याच वादातून पत्नी उज्वलाने घरातून रॉकेलचा डब्बा आणला आणि पतीच्या अंगावर ओतला. त्यानंतर लायटरने त्यांना पेटवून दिले. या घटनेत मुकेश हे गंभीर भाजले आहेत. मात्र स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. येरवडा पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.