होय..! मी ‘दुर्लक्षित’झालोय...तुमचाच.. पेशवेकालीन कात्रजचा तलाव...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 06:29 PM2018-10-04T18:29:29+5:302018-10-04T19:27:00+5:30

एकेकाळी पुण्याचे प्रेक्षणीय स्थळ समजले जाणाऱ्या या पेशवेकालीन तलावात सांडपाणी सोडले जात आहे. अशा परिस्थितीत पेशवेकालीन तलावाचा श्वास गुदमरत आहे. ..

Yes ..! I am 'ignored' ... your own .. Peshwaiee Katraj lake ...! | होय..! मी ‘दुर्लक्षित’झालोय...तुमचाच.. पेशवेकालीन कात्रजचा तलाव...!

होय..! मी ‘दुर्लक्षित’झालोय...तुमचाच.. पेशवेकालीन कात्रजचा तलाव...!

googlenewsNext
ठळक मुद्देया तलावाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष तलावाच्या सुशोभिकरणासाठी गेल्या काही वर्षात कोटयवधीचा निधीचा खर्च व्यायामासाठी येणाऱ्या तसेच सुटटीच्या दिवशी तलावावर नागरिकांची मोठी संख्या कचऱ्यामुळे व सांडपाण्यामुळे य तलावाचे अस्तित्वच धोक्यात

प्रीती जाधव - ओझा 
पुणे: पाण्यावर पसरलेले तेलकट तवंग... वाढलेली झाडे-झुडपे....तरंगणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, पाणी व मद्याच्या बाटल्या... हे चित्र आहे कात्रज परिसरातील पेशवेकालीन तलावाचे...नगरपालिकेने नानासाहेब पेशवे तलाव परिसरात सुशोभीकरण केले. मात्र, पाण्यात साचलेल्या कचरा-घाणीमुळे हे काम तसे ‘पाण्या ’तच गेले आहे. एकेकाळी पुण्याचे प्रेक्षणीय स्थळ समजले जाणाऱ्या या पेशवेकालीन तलावात सांडपाणी सोडले जात आहे. अशा परिस्थितीत पेशवेकालीन तलावाचा श्वास गुदमरत आहे. या तलावाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे होय.. मी दुर्लक्षित झालोय.. तुमचाच पेशवेकालीन कात्रजचा तलाव अशी भावनिक साद तर हा तलाव महापालिका आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तर घालत नसेल ना...! 
नुकत्याच झालेल्या पावसाने पाण्यापेक्षा अधिक आसपासच्या गावांमधील कचरा जमा झाला आहे. विशेष बाब म्हणजे या तलावाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले असल्याने तलावाच्या कावर थर्माकॉल, प्लास्टिक, तसेच वैद्यकीय कचऱ्याचे घटकही अस्ताव्यस्तपणे पसरलेले असून हा कचरा काढून घेण्यासाठी मागणी तलावाच्या परिसरातील नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केली आहे.या तलावाची स्वच्छता करणे गरजेचे झाले आहे. 

सुशोभित पेशवेकालीन तलाव घाणीच्या विळख्यात 
कात्रज येथील या तलावात गुजरवाडी, निंबाळकरवाडी, भिलारवाडी तसेच मांगडेवाडी आणि कात्रजच्या घाटमाथ्यावरून येणारे नाले तसेच ओढ्यांचे पाणी येते. त्यात हे ओढे ज्या गावांमधून येतात त्या गावांमध्ये कचरा व्यवस्थापन तसेच सांडपाण्याची योग्य प्रकारे व्यवस्था नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांकडून कचरा तसेच सांडपाणी या नाल्यांमध्येच सोडले जाते. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे या तलावात हे नाले तसेच ओढ्यांमध्ये साचलेला कचरा थेट या पेशवेकालीन तलावात आलेला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचून दुर्गंधी येत आहे. या तलावातील पाण्यात नागरिक निर्माल्य टाकतात. याव्यतिरिक्त प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या व मद्याच्या बाटल्यांचा खचही दिसून येतो. तलावाला झाडा-झुडपांनी वेढले आहे. लगतच नगरपालिकेने मुलांना खेळण्यासाठी आजी-आजोबा उद्यान उभारले आहे. दिवसा मुले खेळतात, तर रात्री या जागेचा ताबा मद्यपी घेत आहेत. मद्याच्या बाटल्या; तसेच खाद्यपदार्थांच्या पिशव्या तलावातील पाण्यात टाकण्यात येत आहेत. 
तलावाचे अस्तित्वच धोक्यात 
 नगरपालिकेने या तलावाचे सुशोभीकरण केले आहे. परिसरात मोफत वायफाय सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिवसभर येथे तरुणांची लगबग सुरू असते. प्रेमी युगुलांसाठी हे हक्काचे ठिकाण बनले आहे. सकाळी, सायंकाळी परिसरातील नागरिक येथे फिरण्यास, चालण्यासाठी येतात. लोकांची गरज बनलेल्या या तलावाच्या पाण्यावर प्रचंड घाण पसरली आहे. अस्वच्छतेमुळे सुशोभीकरणाच्या हेतूलाच नख लागले आहे. प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणात आहे. हा कचरा काढून घेण्यासाठी मागणी तलावाच्या परिसरातील नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केली आहे. विशेष बाब म्हणजे या तलावाच्या सुशोभिकरणासाठी गेल्या काही वर्षात कोटयवधीचा निधीचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, या वाढत्या कचऱ्यामुळे व सांडपाण्यामुळे य तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. 
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 
तसेच महापालिकेकडून या उद्यानात सर्वात उंच राष्ट्रध्वज बसविण्यात आलेला असून या भागातील तलावाच्या काठाचे सुशोभिकरणही केलेले आहे. तसेच या ठिकाणी फुलराणीही बसविण्यात आली आहे. त्यामुळे या तलावावर सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी येणाऱ्या तसेच सुटटीच्या दिवशीही नागरिकांची मोठी संख्या असते. मात्र, या तलावाच्या काठावर साचलेल्या कचऱ्यामुळे या तलावाला कचरा डेपोचे स्वरूप आल्याचे चित्र असून या तलावाकडे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Yes ..! I am 'ignored' ... your own .. Peshwaiee Katraj lake ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.