"होय, मीच रक्त दिले", आईची कबुली, पोर्शे कार अपघात प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 11:48 AM2024-06-02T11:48:12+5:302024-06-02T11:49:25+5:30

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

Yes, I gave the blood; Mother's confession Porsche car accident case, minor's mother finally arrested | "होय, मीच रक्त दिले", आईची कबुली, पोर्शे कार अपघात प्रकरण

"होय, मीच रक्त दिले", आईची कबुली, पोर्शे कार अपघात प्रकरण

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील पोर्शे कारचालक अल्पवयीन मुलाच्या आईला शनिवारी पोलिसांनी अटक केली. सकाळी साडेसात वाजता वडगाव शेरी येथील राहत्या घरी तिला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास अटक करण्यात आली.

मुलाच्या वैद्यकीय चाचणीदरम्यान ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. ते मुलाच्या आईचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तशी कबुली आईने पोलिसांसमोर दिली आहे. मुलाच्या बिल्डर वडिलांनादेखील अगोदरच अटक करण्यात आली आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. त्यावेळी रुग्णालयात अल्पवयीन मुलासह चौघेजण उपस्थित होते. याप्रकरणी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली. 

आतापर्यंत तीन गुन्ह्यांत दहा अटकेत
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आतापर्यंत तीन गुन्ह्यांत दहा जणांना अटक करण्यात आली असून, बिल्डरच्या कुटुंबातील तिघांचा त्यामध्ये सहभाग आहे.

मुलाच्या आईचीही करणार डीएनए टेस्ट
मुलाचे रक्तनमुने बदलल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांना ते रक्त कोणाचे हे शोधायचे होते. मुलाच्या आईने ते रक्त आपले असल्याची कबुली  दिली आहे. मात्र, त्यासाठी डीएनए चाचणी करणे पोलिसांसाठी गरजेचे आहे.

विशाल अग्रवालचे महाबळेश्वरमधील हॉटेल सील
महाबळेश्वर : शासकीय मिळकतीचा गैरवापर केल्याप्रकरणी पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याचे महाबळेश्वर येथील ‘एमपीजी क्लब’ हे आलिशान हॉटेल जिल्हा प्रशासनाने शनिवारी सील केले. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता अभय हवालदार यांनी रहिवासी इमारतीचा व्यावसायिक वापर होत असल्याची तक्रार दाखल केली होती.

सीसीटीव्ही फुटेजमधूनही झाले स्पष्ट
रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईला शनिवारी रेंजहिल्स येथील गुन्हे शाखा युनिट चारच्या कार्यालयात बोलावून तिची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने मुलाचे बदलण्यात आलेले रक्त आपलेच असल्याची कबुली दिली. रुग्णालयातील ताब्यात घेण्यात आलेले चित्रीकरण तसेच तांत्रिक विश्लेषणामध्ये मुलाची आई तेथे उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

बाल न्याय मंडळासमोर झाली चौकशी, मात्र दिली उडवाउडवीची उत्तरे
अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी शनिवारी येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या कार्यालयात दोन तास चौकशी केली. त्यावेळी अल्पवयीन मुलाची आई, तसेच बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते. अल्पवयीन मुलासह त्याच्या आईनेही पोलिसांना चौकशीत माहिती दिली नाही. तसेच, उडवाउडवीची उत्तरे दिली.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाची पालकांसमोर चौकशी करण्यास बाल न्याय मंडळाने पोलिसांना परवानगी दिली. त्यानंतर गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी मुलाची चौकशी केली. 
अपघाताच्या वेळी कार कोण चालवित होते, ब्लॅक आणि कोझी पबमध्ये कोण उपस्थित होते, तसेच ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले तेव्हा कोण उपस्थित होते, याबाबतची माहिती पोलिसांनी घेतली. त्यावेळी मुलाने पोलिसांना तपासात फारशी माहिती दिली नाही. तसेच, मुलाची आईदेखील नीट उत्तरे दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Yes, I gave the blood; Mother's confession Porsche car accident case, minor's mother finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.