कोरोना काळात अस्थमा रुग्णांसाठी योगासने फायदेशीर उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:19 AM2021-05-05T04:19:05+5:302021-05-05T04:19:05+5:30

पुणे : सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अभ्यासानुसार मध्यम ते गंभीर वर्गात मोडणाऱ्या अस्थमाच्या सर्व रुग्णांना कोरोना विषाणूचा ...

Yoga is a beneficial remedy for asthma patients during the corona period | कोरोना काळात अस्थमा रुग्णांसाठी योगासने फायदेशीर उपाय

कोरोना काळात अस्थमा रुग्णांसाठी योगासने फायदेशीर उपाय

Next

पुणे : सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अभ्यासानुसार मध्यम ते गंभीर वर्गात मोडणाऱ्या अस्थमाच्या सर्व रुग्णांना कोरोना विषाणूचा जास्त धोका असतो. अस्थमामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता आधीच कमी झालेली असते. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांनी घराबाहेर पडू नये, टेलिमेडिसीनच्या सहाय्याने डॉक्टरांच्या संपर्कात रहावे, नियमित औषधोपचार सुरू ठेवावेत आणि श्वसनाचे नियमित व्यायाम करावेत, असे आवाहन ''जागतिक अस्थमा दिना''निमित्त डॉक्टरांनी केले आहे.

अस्थमाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी नियमित योगासने आणि मुद्राभ्यास फायदेशीर ठरतो. अस्थमाच्या रुग्णांमध्ये श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो. अशा वेळी शीर्षासन, भुजंगासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन यासारखी योगासने आणि अनुलोमविलोम, प्राणायाम फायदेशीर ठरतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने अस्थमा रुग्णांनी व्यायामावर लक्ष द्यावे, असे सांगितले जाते.

----

कोरोना काळात अस्थमाच्या रुग्णांनी बाहेर जाणे टाळावे. अस्थमाच्या रुग्णांमध्ये फुफ्फुसांची कार्यक्षमता आधीच कमी झालेली असते. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. बाहेर जाण्याची वेळ आलीच तर डबल मास्क वापरावा. कोरोना हा श्वसन संस्थेशी संबंधित आजार आहे. कोरोनाचा विषाणू थेट श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यास गंभीर स्थिती उद्भवू शकते. यातून न्युमोनिया किंवा फायब्रोईडची शक्यता वाढते. त्यामुळे अस्थमा व्यतिरिक्त इतर कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टरांनी दिलेली सर्व औषधे वेळेवर घ्यावीत. कोरोनाचे औषधोपचार सुरू असताना इतर औषधे बंद करू नये.

- डॉ. वैभव पांढरकर, चेस्ट फिजिशियन, नोबेल हॉस्पिटल

----

कोरोना काळात अस्थमा रुग्णांनी घराबाहेर जाऊन व्यायाम करणे टाळावे. फिजिओथेरपिस्टने सांगितल्यानुसार श्वसनाचे व्यायाम तसेच इतर व्यायाम घरच्या घरी सुरू ठेवावेत. रुग्णांनी लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे. लस घेतल्याने कोरोना होण्याची शक्यता कमी होते आणि झालाच तरी त्याची तीव्रताही कमी असते. रुग्णांनी धूम्रपान काटेकोरपणे टाळावे.

- रझिया नगरवाला, फिजिओथेरपिस्ट, संचेती हॉस्पिटल

----

दम्याच्या रुग्णांना कोविडसारखी लक्षणे दिसली की, हे रुग्ण मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचून जात असल्याने त्यांनी पुरेशी विश्रांती घेणे, ध्यान-धारणा करणे आवश्यक आहे. दम्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. म्हणून जवळील व्यक्तीला दम्याचा त्रास असेल तर त्या व्यक्तीची लक्षणे, त्यांना होणारा त्रास याची वेळोवळी नोंद ठेवा. त्यांना लागणाऱ्या औषधांची यादी देखील नियमितपणे सोबत ठेवा. तपासणीकरिता जाताना देखील या व्यक्तींच्या सोबत रहा. घरच्या घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. परिस्थिती नियंत्रणात नाही, असे वाटल्यास डॉक्टरांना फोन करा.

- डॉ.संजय नगरकर, जनरल फिजिशीयन, अपोलो स्पेक्ट्रा

-

Web Title: Yoga is a beneficial remedy for asthma patients during the corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.