योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
By नितीश गोवंडे | Published: November 29, 2023 08:26 PM2023-11-29T20:26:58+5:302023-11-29T20:27:44+5:30
योगाची शिस्त कैवल्यप्राप्तीसाठी उपयुक्त आहे हे सत्य आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन काळी विस्तृत संशोधन आणि चाचण्यांनंतर मांडले होते
पुणे : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेचे माध्यम म्हणून योग प्रणाली प्रभावी मानली जाते, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी केले. त्या लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेचा शताब्दी सोहळा आणि ‘शालेय शिक्षणात योगाचे एकत्रीकरण’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या. या कार्यक्रमावेळी राज्यपाल रमेश बैस, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री तथा शताब्दी समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, कैवल्यधामचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश तिवारी आणि सचिव सुबोध तिवारी यांची उपस्थिती होती.
स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केलेल्या कैवल्यधाम च्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून आनंद झाला, असे सांगून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या, भारताचे योग शिक्षण ही जागतिक समुदायासाठी आपली अमूल्य देणगी आहे. भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. योग प्रणाली ही आरोग्य आणि कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टीकोन प्रदान करते आणि ती संपूर्ण जागतिक समुदायाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी, योगाची शिस्त कैवल्यप्राप्तीसाठी उपयुक्त आहे हे सत्य आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन काळी विस्तृत संशोधन आणि चाचण्यांनंतर मांडले होते. महर्षी पतंजली यांनी योगसूत्रात योगविषयी महत्वपूर्ण संशोधन संकलित केले. विसाव्या शतकात स्वामी कुवलयानंद यांच्यासारख्या महान व्यक्तींनी योगपद्धतीची वैज्ञानिकता आणि उपयोगिता नव्या ऊर्जेने मांडली. योग आणि आध्यात्मावर आधारित आधुनिक विज्ञानातील तत्वे त्यांनी जागतिक समुदायासमोर मांडली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर स्वामी कुवलयानंद यांच्या संपर्कात होते. स्वामीजींच्या मार्गदर्शनाचा देशातील महान व्यक्तिमत्त्व आणि सामान्य लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला. स्वामीजींची योग शिकवण त्यांच्या शिष्य परंपरेने पुढे नेली जात आहे असेही राष्ट्रपती म्हणाल्या.