योगेश टिळेकरांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पुनर्वसन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 09:50 AM2024-07-02T09:50:06+5:302024-07-02T09:50:48+5:30
विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक होत आहे. यामधील पाच जागांसाठी भाजपने आज उमेदवारी जाहीर केली...
पुणे : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार योगेश टिळेकर यांना ओबीसी चेहरा म्हणून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे योगेश टिळेकर यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक होत आहे. यामधील पाच जागांसाठी भाजपने आज उमेदवारी जाहीर केली. त्यामध्ये पुण्यामधून माजी आमदार आणि भाजप ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या योगेश टिळेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी त्यांच्या गळ्यात पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महायुतीमध्ये विद्यमान आमदाराच्या जागा संबंधित पक्षाला देण्यात येणार आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे आहेत. त्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे राहणार आहे. त्याने हडपसर मतदारसंघ भाजपकडे येण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे ओबीसी चेहरा असलेल्या योगेश टिळेकर यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता हडपसर विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार चेतन तुपे यांचा आणि शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा दावा मजबूत झाला आहे.