म्हणून सांगतो...तू हवा आहेस...आरक्षण घेतेवेळी...! : बारामती ते मुंबई संवाद यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 09:31 PM2018-08-03T21:31:38+5:302018-08-03T21:31:47+5:30
सरकार जखमींना आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत करेल... भविष्यात आरक्षण मिळेलही पण त्याचा लाभ घेण्यासाठी तू नसशील..म्हणून सांगतो राजा... आत्महत्त्या करू नकोस संवाद साध..
बारामती : मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत १४ जणांनी आत्महत्या केली आहे. समाजकंटकांकडून मोर्चाच्या नावाखाली जाळपोळ, मोडतोड सुुरू आहे. त्यामुळे मन हेलावून गेले आहे. आरक्षण मिळणारच आहे. सरकार जखमींना आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदतदेखील करेल. मात्र, गेलेला जीव परत येणार नाही. या पार्श्वभूमीवर, समाजबांधवांनी आत्महत्येपासून परावृत्त व्हावे; यासाठी मराठा समाजबांधवांशी संवाद साधण्याकरिता ‘मराठा संवाद यात्रा’ आयोजित केली आहे, अशी माहिती माजी विक्रीकर उपायुक्त प्रशांत सातव यांनी दिली. सातव यांच्या संकल्पनेतून या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत सातव यांनी अधिक माहिती देताना, आता आरक्षणाच्या निर्णयाला उशीर होत असल्याने समाजबांधव सामाजिक असंतोषाने पेटून भावनिक झाला आहे. कै.काकासाहेब शिंदे यांच्यासारखे अनेक समाजबांधव व भगिनी समाजासाठी शहीद झाले आहेत.
काही समाजबांधव हातात कायदा घ्यायला लागले आहेत. याचा फायदा काही समाजकंटक घेऊन मराठा समाजाला व मराठा क्रांती मोर्चाला बदनाम करू पाहत आहेत. हा धोका आपण वेळीच ओळखणे आवश्यक आहे. यापूर्वी काढण्यात आलेले ५८ मूक मोर्चे राज्यात यशस्वी ठरले. यामध्ये सर्वच कुटुंबांतील वडीलधारी, माता, भगिनी तसेच लहान मुले-मुली सहभागी झाली होती. मात्र, असुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांचा कोठे सहभाग आढळून येत नाही. काही समाजकंटकांनी जाळपोळ, तोडफोड, घोषणाबाजी केल्यामुळे त्यांना स्वत:च्या सुरक्षेचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सामाजिक संदर्भ, ताणलेला जातीय संदर्भ, त्याची दूरवर पोहोचणारी जातीय धग व होणारा दीर्घकालीन सामाजिक व सांस्कृतिक परिणाम या सर्वांचा विचार करून आंदोलनाच्या सद्य:स्थितीचा फेरविचार करणे आवश्यक आहे. समाजबांधवांवर गुन्हे दाखल होत आहेत; त्यामुळे तरुण पिढीच्या आयुष्याचे नुकसान होणार आहे. या वैचारिक चिंतनातून सामाजिक एकोपा टिकविण्यासाठी आणि जाती-जातींतील द्वेष वाढू नये, मराठा समाजाचे आंदोलन बदनाम होऊ नये, यासाठी समाजबांधव, विचारवंत, प्रसारमाध्यमे यांच्याशी संवाद साधून उत्कर्षासाठी संवाद यात्रेचे
आयोजन करण्यात आले आहे, असे सातव यांनी सांगितले.
................
. ५ आॅगस्ट रोजी बारामती येथील श्री छत्रपती शिवाजी उद्यान, कसबा येथून मराठा संवाद यात्रेचे प्रस्थान होणार आहे. रविवारी (दि. ५) नीरा, सोमवारी (दि. ६), मंगळवारी (दि. ७), बुधवारी(दि. ८) नवी मुंबई येथे संवाद यात्रा मुक्काम करणार आहे. तर, गुरुवारी (दि. ९) मुंबई येथील आझाद मैदानावर यात्रेची सांगता होईल.
.................
..संवाद यात्रेदरम्यान प्रत्येक गावात
संवाद यात्रेदरम्यान प्रत्येक गावात माहितीपत्रक वाटून समाजामध्ये जागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात आंदोलनासाठी शहीद झालेल्या समाजबांधवांना श्रद्धांजली अर्पित करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात समाजबांधवांना मार्गदर्शन, प्रबोधन करणार. सर्व समाजबांधव एकत्र येऊन लढा चालू ठेवण्यासाठी प्रतिज्ञा घेणार, असे संयोजकांनी सांगितले. तसेच, ‘नको जाऊस बाळा बळी, तू हवा आहेस आरक्षण घेतेवेळी’, ‘आपण लावला आहे आरक्षणाचा वृक्ष, नको होऊ परिस्थितीचे भक्ष्य’, ‘सेव्ह मराठा-सेव्ह मराठा’ या घोषवाक्यांद्वारे संवाद साधण्यात येणार आहे.