आपण पोलीस ठाण्यात आला होता, काम झाले का तुमचे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:11 AM2021-09-13T04:11:21+5:302021-09-13T04:11:21+5:30
स्टार ११४४ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नमस्कार, आपण पोलीस ठाण्यात आला होता. आपले काम झाले का? असा फोन ...
स्टार ११४४
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नमस्कार, आपण पोलीस ठाण्यात आला होता. आपले काम झाले का? असा फोन नागरिकांना आल्यावर प्रथमत: आपल्या कामाची कोणीतरी दखल घेतली, याचे नागरिकांना समाधान वाटते. त्याबरोबर पोलीस आपले काम करतील याविषयी विश्वास वाढीस लागतो. पुणे शहर पोलिसांच्या वतीने सेवा प्रकल्प राबविला जातो. त्यातून पोलीस ठाण्यात कामासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे काम काय होते, ते काम झाले का, याविषयी विचारणा केली जाते. त्यातून तक्रार दाखल करून न घेणे, गुन्हा कोणाच्या हद्दीत घडला आहे, आमच्या हद्दीत गुन्हा घडला नाही, अशी उत्तरे देऊन नागरिकांना हेलपाटे लावण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे.
नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्याबरोबर पीडितांना मदत करण्याच्या उद्देशाने सेवा प्रकल्प सप्टेंबर २०१८ मध्ये पुणे पोलिसांनी कार्यन्वित केला. त्यात प्रत्येक पोलीस ठाणे व प्रत्येक पोलीस चौकीत एक टॅब देण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात कोणीही आले की, त्यावर त्यांची संपूर्ण माहिती भरली जाते. त्यांचा फोटो घेतला जातो. त्यांचे काय काम आहे, त्यानुसार त्यांना संबंधित विभागाकडे पाठविले जाते. त्यानंतर पोलीस ठाण्याला भेट दिलेल्या सर्व नागरिकांची माहिती ऑनलाईन पोलीस आयुक्तालयातील सेवा केंद्रात जाते. दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी या केंद्रातून नागरिकांना फोन करून माहिती विचारली जाते. तुमचे काम झाले का, तुम्ही समाधानी आहात का, समाधानी नसतील अथवा काम झाले नसेल अशा तक्रारदारांची माहिती पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांकडे जाते. त्यांच्याकडून त्याची दखल घेतल्यानंतरही नागरिकाचे काम झाले नाही तर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांमार्फत त्या तक्रारीत लक्ष घातले जाते.
स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनेही सेवा प्रकल्पाचे परीक्षण करण्यात आले आहे. त्यात ६५ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते.
सेवा प्रकल्पातून प्रत्यक्ष पोलीस ठाण्याला भेट देणाऱ्या नागरिकांच्या कामाबाबत वॉच ठेवला जात असल्याने पोलीस ठाण्याच्या कामकाजात सुधारणा झाली आहे. उलट पोलिसांचे जे काम नाही, अशा तक्रारीविषयी संबंधित शासकीय संस्थांची माहिती तसेच संबंधितांचे संपर्क क्रमांक देऊन नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे.
......
अनेक सेवा आता ऑनलाइन
लॉकडाऊनच्या अगोदर सेवा प्रकल्पातून पुणे शहरातील ३० पोलीस ठाण्यात भेट देणाऱ्या सुमारे ८०० नागरिकांना फोन करून चौकशी केली जात असे. लॉकडाऊनमध्ये अनेक सेवा आता ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोलीस ठाण्यात नागरिकांचे येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या सेवा प्रकल्पातून दररोज साधारण ३०० नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या कामाविषयी चौकशी केली जाते.