तुम्हीही बनू शकता ‘देवदूत’, नागपूर-पुणे प्रवासात ससूनच्या डॉक्टरने वाचविले प्रवाशाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 01:50 AM2018-12-27T01:50:48+5:302018-12-27T01:51:01+5:30

विमानात एका प्रवाशाचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करून त्याला डॉक्टरांनी जीवनदान दिले. पण, या विमानात डॉक्टर नसते तर... कोणत्याही ठिकाणी असा प्रसंग ओढवू शकतो.

You can become a 'Devdoot', Nagpur-Pune traveler's life saved by a doctor of Sassoon | तुम्हीही बनू शकता ‘देवदूत’, नागपूर-पुणे प्रवासात ससूनच्या डॉक्टरने वाचविले प्रवाशाचे प्राण

तुम्हीही बनू शकता ‘देवदूत’, नागपूर-पुणे प्रवासात ससूनच्या डॉक्टरने वाचविले प्रवाशाचे प्राण

googlenewsNext

पुणे : विमानात एका प्रवाशाचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करून त्याला डॉक्टरांनी जीवनदान दिले. पण, या विमानात डॉक्टर नसते तर... कोणत्याही ठिकाणी असा प्रसंग ओढवू शकतो. तिथे डॉक्टर असतीलच, असे नाही. सर्वसामान्य नागरिकांनाही जीवन संजीवनी अर्थात कार्डिओपल्मनरी रेस्युसीटेशन (सीपीआर) देऊन बंद हृदय सुरू करता येते. तुम्हीही डॉक्टरांप्रमाणे ‘देवदूत’ बनू शकता.
ससून रुग्णालयात नुकतेच सर्वसामान्यांसाठी याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. नागपूर ते पुणे यादरम्यानच्या विमान प्रवासात ससून रुग्णालयातील बालरोग विभागातील सहयोगी प्राध्यापक व सीपीआर केंद्राचे संचालक डॉ. उदय राजपूत यांनी एका प्रवाशाचे प्राण वाचविले. कोल्हापूर येथील अशोक जाधव (वय ५८ वर्षे) यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
डॉ. राजपूत यांनी तातडीने ‘सीपीआर’ सुरू केल्याने जाधव यांचे हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले.
डॉ. राजपूत हे ‘सीपीआर’चे
प्रशिक्षक आहेत; त्यामुळे त्यांना हे शक्य झाले. असे प्रसंग दैनंदिन जीवनात कुठेही, कोणत्याही वेळी घडू शकतात; पण प्रत्येक ठिकाणी असे डॉक्टर असतीलच, असे नाही. एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने ‘सीपीआर’
देणे सर्वसामान्य नागरिकांनाही शक्य आहे.
वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार म्हणून ‘सीपीआर’चे महत्त्व जागतिक पातळीवर मान्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे याबाबतचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही दिले जाते.

डॉक्टर, नर्स : प्रशिक्षणासाठी २०० रुपयांचे शुल्क

भारतामध्ये इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनने तयार केलेल्या कोर्सद्वारे प्रशिक्षण देण्यात येते. देशात अ‍ॅकॅडमीद्वारे केवळ ३५ केंद्रांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे. त्यामध्ये आता ससून रुग्णालयाचाही समावेश झाला आहे. राज्यामध्ये ससूनसह केवळ चारच अशी केंद्रे आहेत. ससूनमध्ये २०१५ पासून असे प्रशिक्षण दिले जाते; पण आतापर्यंत प्रामुख्याने डॉक्टर, नर्स यांच्यासाठीच हे प्रशिक्षण होते. त्यासाठी प्रत्येकी किमान २०० रुपये शुल्क घेतले जाते.

सर्वसामान्यांनी ३ ते ४ तासांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तेही ‘सीपीआर’ देऊन प्राण वाचवू शकतात. किमान ३० ते ४० जणांचा गट असल्यास त्यांना एकत्रितपणे मोफत प्रशिक्षण देणे शक्य आहे. रुग्णालयातील केंद्रामध्ये त्यासाठी सर्व सुविधा आहेत. तसेच, इतर ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असल्यास तिथेही हे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ जण प्रशिक्षण देतात.
- डॉ. उदय राजपूत,
संचालक, सीपीआर केंद्र, ससून रुग्णालय

प्रशिक्षण बंधनकारक
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या कालावधीत तीन तासांचे प्रशिक्षण बंधनकारक आहे. केंद्राला आता राष्ट्रीय मान्यता मिळाल्याने सर्वसामान्यांना प्रशिक्षण देण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक प्रौढांच्या २० आणि लहान मुलांच्या २० मानवी ‘डमी’ मदतरूपाने मिळाल्या आहेत.

Web Title: You can become a 'Devdoot', Nagpur-Pune traveler's life saved by a doctor of Sassoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.