Indian Railway: रेल्वेचे वेटिंग तिकीट असले तरीही तुम्हाला मिळू शकते जागा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 11:32 AM2023-08-02T11:32:35+5:302023-08-02T11:33:36+5:30
मशीनवर प्रवाशांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवणार...
पिंपरी :रेल्वेत आपले तिकीट आरक्षित असले तरी, तिकीट बुकिंग असलेले स्टेशनचे पुढील स्टेशन येईपर्यंत तुम्ही जागेवर नाही गेलात तर ती जागा दुसऱ्या प्रवाशाला दिली जाणार आहे.
पुढील स्थानक येईपर्यंत आरक्षित जागेवर बसणे आवश्यक
रेल्वे प्रशासनाने आता टीसींना हँड हेल्ड टर्मिनल (टॅब) दिला आहे. त्यामुळे नागरिकांना येथून पुढे तिकीट आरक्षण ज्या स्थानकावरून असेल तेथून आणि त्या पुढील एका स्थानकावरून आरक्षित जागेवरून प्रवास करण्याची मुभा असेल. त्यानंतर टीसी त्या जागेवर नॉट टर्न्ड अप (एनटी) ची नोंद करणार आहे. त्यामुळे वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशाला ती जागा मिळणार आहे.
यापूर्वी काय व्हायचे ?
एखादा प्रवासी बुकिंग केलेल्या स्थानकावर प्रवास न करता त्यापुढील कोणत्याही स्थानकावरून प्रवास करत होता. त्यामुळे वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना सीट मिळताना अडचणी येत होत्या, तसेच बऱ्याच वेळा जागाच मिळत नव्हती.
मशीनवर प्रवाशांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवणार
ट्रेन सुटल्यानंतर टीसी प्रत्येक जागेवर जाऊन प्रवाशांची उपस्थिती त्यांच्याजवळ असलेल्या पेपरवर नोंदवत होते; पण आता टीसींना टॅब दिल्यामुळे रिक्त जागांची माहिती ऑनलाइन उपस्थिती नोंदवता येत आहे. त्यामुळे टीसींचे काम सोपे झाले आहे, तसेच ट्रेनमधील रिक्त जागांची माहिती ऑनलाइन मिळत असल्याने वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना सहज सीट उपलब्ध करून देता येत आहेत.