मुलीचे ‘न्यूड’ दृष्य दिसते तिथेच तुम्ही फसता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:11 AM2021-05-12T04:11:09+5:302021-05-12T04:11:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सोशल मीडियावर एखाद्या अनोळख्या व्यक्तीची (मुलगा किंवा मुलगी) फ्रेंड रिक्वेस्ट येते. त्याचा स्वीकार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोशल मीडियावर एखाद्या अनोळख्या व्यक्तीची (मुलगा किंवा मुलगी) फ्रेंड रिक्वेस्ट येते. त्याचा स्वीकार केला जातो. मग चॅटिंग सुरू होते. ओळखीमधून व्हिडिओ कॉल करण्याची मागणी होते. आपण त्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल केल्यानंतर मुलीचे ‘न्यूड’ दृश्य समोर दिसायला लागते आणि तुम्ही ते बघतानाचा कॉल रेकॉर्ड केला जातो. पण इथेच तुम्ही फसलेले असता. मग हाच रेकॉर्डेड व्हिडिओ कॉल पोस्ट करण्याची धमकी देऊन तुमच्याकडून पैशांची मागणी केली जाते.
लॉकडाऊनपासून गेल्या वर्षभरामध्ये अशा प्रकारच्या सायबर तक्रारींमध्ये वाढ झालेली असून, याला प्रामुख्याने १८ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणाई बळी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सायबर तज्ज्ञांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी, वर्क फ्रॉम होम आदींमुळे लोक घराबाहेर पडणे कमी झाले आहे. शाळा-कॉलेज बंद आहेत. मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना भेटता येत नसल्याने सोशल मीडियावर नवीन ‘फ्रेंड’ बनविण्याचा ‘ट्रेंड’ आहे. खोटी प्रोफाईल तयार करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्याच्या टोळ्या सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत.
सुरुवातीला हल्लेखोरांकडून त्या व्यक्तीचे फोटो मागविले जातात, मग ते पॉर्न साईटसवर टाकण्याची धमकी दिली जाते. ते टाकायचे नसतील तर एक व्हिडिओ कॉल करायला सांगतात. यातले ८० टक्के कॉल्स असे असतात जिथे समोर व्यक्ती नसते मोबाइल स्क्रीनच्या जवळ नेला जातो. जेणेकरून लाइव्हकॉल चालू आहे असे वाटेल. एखाद्या मुलासमोर अचानक एखादी मुलगी नग्नावस्थेत आल्यानंतर त्या मुलाला शॉक बसतो. ती मुलगी खरी असतेच असे नाही. तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जातो आणि मग ब्लॅकमेलिंग सुरू होते. यातच आपण त्या व्यक्तीला फेसबुक, इंस्ट्राग्राम आणि ट्विटरचे आयडी दिलेले असतात. मग हल्लेखोर व्यक्ती जर मला पैसे दिले नाहीस तर हा कॉल सर्वत्र पोस्ट करण्याची धमकी देतो. लॉकडाऊनमध्ये अनेक लोक अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडले असल्याची माहिती सायबर तज्ज्ञ रोहन न्यायाधीश यांनी ‘लोकमत’ला दिली. पूर्वी महिन्याला सात ते आठ सायबर गुन्हे घडत होते. पण, लॉकडाऊनपासून महिन्यातून 20 ते 25 गुन्हे घडत असल्याचे ते म्हणाले.
-------------------------------------
तुमचा मोबाइल डेटाही केला जातोय ‘हॅक’
सायबर हल्लेखोर तुमच्या मोबाइलमध्ये एक पे लिंक पाठवतात. ती लिंक ओपन केल्यास तुमचा मोबाइलचा सर्व डेटा हल्लेखोरांकडे जातो. तुमचा कॉललॉक पॅटर्न काय आहे, लोकेशन कुठलं आहे, कुणाला मेसेज करताय हे सगळं त्यांच्याकडे जाते. जे खूप घातक आहे. त्यातूनही हल्लेखोर तुमचं शोषण आणि ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे रोहन न्यायाधीश म्हणाले.
-----------------------------------------------------------------------------------------
काय करायला हवं?
* सोशल मीडियात अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका आणि व्हिडिओ कॉल्सच्या लिंक ओपन करू नका.
* अनोळखी व्यक्तींशी संपर्क करू नका आणि केला तरी आपली माहिती देऊ नका.
-------------------------------------------------------
“सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरविणे, खोटी प्रोफाईल तयार करून संभाषण करणे, मुलींचे फोन नंबर कॉल गर्ल म्हणून सोशल मीडियावर टाकणे, मॉर्फिंग असे सायबर गुन्हे नोंदविले जात आहेत. या गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी सोशल मीडियावर दक्षता घेणे आवश्यक आहे. वैयक्तिक फोटो सार्वजनिक माध्यमावर टाकले तर गुगलकडे सेव्ह होतात. त्यानंतर ते मॉर्फिंग करणे सोपे जाते. मॉर्फिंग थांबविता येणे शक्य नाही. याकरिता आपले प्रोफाईल पब्लिकसाठी खुले करू नये. वैयक्तिक किंवा मुलांचे फोटो सोशल मीडियावर टाकणे टाळावे. कुठलाही सायबर गुन्हा घडल्यानंतर सायबर सेलला तक्रार करणे महत्त्वाचे आहे.”
- ॲड. गौरव जाचक, सायबर क्राईम वकील