पुढील काळात आपल्याला बिबट्या समवेतच राहावे लागेल..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 09:22 PM2020-01-08T21:22:10+5:302020-01-08T21:24:44+5:30

जंगलापेक्षा उस शेतीचा घेतोय बिबट्या आसरा..

You have live with leopard in the coming soon | पुढील काळात आपल्याला बिबट्या समवेतच राहावे लागेल..

पुढील काळात आपल्याला बिबट्या समवेतच राहावे लागेल..

Next
ठळक मुद्देसर्पदंश व विंचूदंशाची संख्या व त्याने जीवितहानी होण्याचे प्रमाण जास्त ‘मानव व वन्यजीव संघर्ष : चिंता व निराकरण’ या विषयावर आयोजित परिषद

पुणे : ऊस शेती हा बिबट्याला आश्रयस्थान म्हणून मिळालेला पर्याय आहे. तो, जंगलापेक्षा ऊस शेतातच अधिक दिसून येत आहे. त्यामुळे या पुढील काळात आपल्याला बिबट्या सोबतच रहायचे असून, ते सहजीवन असेल असे माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले. 
बायोस्फिअर्स व वनस्पतीशास्त्र विभाग, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड यांच्या वतीने ‘मानव व वन्यजीव संघर्ष : चिंता व निराकरण’ या विषयावर आयोजित परिषदेत ते बोलत होते. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये, सर्पदंश उपचार तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जीवशास्त्रज्ञ अनिरुद्ध चाउजी, वरिष्ठ वन अधिकारी व कुरण विकास संशोधक सुभाष बडवे, जुन्नरच्या सरपंच प्रमिलाताई शिंदे, पुण्याचे उपवनसंरक्षक रमेशकुमार, पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यावेळी उपस्थित होते.  
डॉ. देशमुख म्हणाले, बिबट्याला जंगला व्यतिरिक्त राहण्याचा पर्याय मिळाला आहे. कटू असले तरी आपल्याला या पुढील काळात बिबट्या समवेत रहावे लागणार आहे. येणाऱ्या काळात त्याच्याशी संघर्ष नसून सहजीवन असेल. 
‘आगंतुक व उपद्रवी परदेशी वनस्पती फोफावल्यामुळे स्थानिक चारा-वनस्पती कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांमध्ये एकप्रकारचा तणाव निर्माण झाला आहे. म्हणून ते जंगल सोडून मानवी वस्तीमध्ये, शेतीमध्ये हस्तक्षेप करतात. त्यामुळे संघर्ष अटळ असल्याचे’ डॉ. पुणेकर म्हणाले. 
सुभाष बडवे म्हणाले, कुरणांची संख्या कमी होत चालल्यामुळे पाळीव जनावरांना चारा नाही. त्यामुळे ते जंगलात जातात. तिथे वन्य प्राण्यांची ते शिकार बनतात. म्हणून कुरणे वाढवणे आणि चाऱ्याची उपलब्धता वाढविणे आवश्यक आहे. 
ताडेबातील जीवशास्त्रज्ञ चाउजी म्हणाले, जंगल पर्यटन वाढले पाहिजे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन, त्यांचे जंगलावरील अवलंबित्व कमी होईल. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष रोखता येईल. डॉ. राऊत म्हणाले, सर्पदंश व विंचूदंशाची संख्या व त्याने जीवितहानी होण्याचे प्रमाण जास्त आहे. पण सर्पदंश झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी शासनाकडून मदतीची कुठलीही व्यवस्था नाही. शासनाने त्यांना मदत करावी. तसेच, सर्पदंश झाल्यावर काय करायला पाहिजे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे.
यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांसाठी वेताळ टेकडीवर निसर्ग परिचय फेरी आयोजित करण्यात आली होती. टेकडीवरील स्थानिक, देशी, परदेशी वनस्पती, बुरशी, कीटक, हिवाळ्यात खास येणारे पक्षी, पर्यावरण विषयातील अनेक घटकांची कीटक शास्त्रज्ञ किशोर राऊत व वनस्पती अभ्यासक डॉ. पुणेकर यांनी माहिती दिली. 
---------------

Web Title: You have live with leopard in the coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.