तुम्ही कधी पाहिला नसणार '' असा '' आगळा वेगळा लग्न सोहळा..!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 05:33 PM2019-06-03T17:33:47+5:302019-06-03T17:46:01+5:30
पिंपरीताई व पिंपळमामा तसेच गुलमोहरकाका यांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा गोरज मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी होणार आहे.
पिंपरी : सर्वत्र सध्या लग्नसोहळ्यांची धामधूम आहे. असाच एक अनोखा सोहळा उद्योगनरी पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे. पर्यावरणदिनानिमित्त बुधवारी (दि. ५) हा सोहळा आयोजित केला आहे. यात चक्क वधू असलेली चिंच आणि वर असलेला वड अर्थात वटवृक्षाचा विवाह होणार आहे. पिंपरीताई व पिंपळमामा तसेच गुलमोहरकाका यांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा गोरज मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी होणार आहे. यासाठी आकर्षक लग्नपत्रिका छापून त्यांचे वाटप करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमाबाबत पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. यातून वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येणार आहे.
मोशी प्राधिकरणात सोहळा होईल. विठ्ठल वाळुंज यांच्या संकल्पनेनुसार मोशी प्राधिकरणातील संतनगर मित्र मंडळ आणि भूगोल फाऊंडेशनतर्फे आयोजन केले आहे. प्रकृती व पुरुष यांची नात व संदेश सुचिता यांची सुकन्या असलेली चिंच सोहळ्यातील वधू आहे. तर ब्रह्म व माया यांचे नातू व संस्कृती व संस्कार यांचे ज्येष्ठ चिरंजीव वड अर्थात वटवृक्ष या सोहळ्यातील वर आहे.
वधू चिंच व वर वड यांच्या या विवाहसोळ्यात औदुंबर, आंबा, फणस, चिक्कू, पारीजातक, सोनचाफा, अर्जून, तामण, वावळ, सावर, कडुलिंब, आवळा, मोगरा, गुलाब, झेंडू, चाफा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. जाई, जुई, चंपा, चमेली, शेवंती, गुलछडी, बिजली आदी मानाच्या करवल्या आहेत. पांगारा, बहावा, गुलमोहर, पळस, फणस आदी या सोहळ्यातील मान्यवर आहेत. मोगरा, जाई-जुई, निशिगंधा, चमेली, गुलाब, रातराणी, सदाफुली यांची किलबिल राहणार आहेत. आयुर्वेदिक वृक्ष, देशीवृक्ष, कुदळ, फावडे, टिकाव, पहार, घमेले, खुरपे, बकेट, झाडांचे खत अशा प्रकारेच आहेर स्वीकारले जाणार आहेत.
पश्चिम बंगाल येथे यापूर्वी असा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यात येणारा हा दुसरा उपक्रम आहे. पर्यावरणाचा संदेश देत विविध संकल्प या सोहळ्यानिमित्त करण्यात येणार आहेत. झाडांना पाणी घालू, गरज नसेल तेव्हा वीज, पंखे बंद ठेवू, पाणी काटकसरीने वापरू, ओला-सुका कचरा वेगवेगळा ठेवू, प्लास्टिक व थमार्कोलचा वापर बंद करू, सायकल वापर करणार, झाडे लावू, झाडे जगवू आदींचा त्यात समावेश आहे.