तुम्हालाही भासू शकते रक्ताची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:44+5:302021-07-04T04:07:44+5:30
पुणे : कोरोना काळात गेल्या दीड वर्षात रक्तदानाचे प्रमाण घटल्याने सध्या रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. रक्त कोणत्याही कारखान्यात कृत्रिम ...
पुणे : कोरोना काळात गेल्या दीड वर्षात रक्तदानाचे प्रमाण घटल्याने सध्या रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. रक्त कोणत्याही कारखान्यात कृत्रिम पद्धतीने तयार होत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करणे हे आपले कर्तव्य आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्येक नागरिकाने दर तीन महिन्यांनी म्हणजे वर्षातून चार वेळा रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची साथीचे थैमान सुरू झाले आणि लॉकडाऊन लावण्यात आले. लोक घराबाहेर पडू शकत नसल्याने रक्तदानावर मोठा परिणाम झाला. पहिली लाट ओसरल्यावर आणि दुसरी लाट सुरू होण्यापूर्वीच्या मधल्या काळात काही प्रमाणात रक्तदान झाले. मात्र, रक्तदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणे आवश्यक आहे. लसीकरण झाल्यावर किंवा कोरोना होऊन गेल्यावर ठराविक कालावधीने रक्तदान करता येते. त्यामुळे कोणत्याही गैरसमजावर विश्वास न ठेवता दर तीन महिन्यांनी रक्तदान करता येऊ शकते.
चौकट
रक्ताचा आहे तुटवडा
“रेड क्रॉस सोसायटीच्या नियमावलीनुसार लसीकरणानंतर १४ दिवसांनी आणि कोरोना होऊन गेल्यावर २८ दिवसांनी रक्तदान करता येते. कोरोनामुळे रक्त संकलन मोहिमेवर मोठा परिणाम झाला आहे. दुर्मिळ रक्तगटांच्या रक्ताचा नेहमीच तुटवडा भासतो. रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. त्यामुळे आपणच रक्तदानासाठी पुढाकार घ्यायला हवा. एका व्यक्तीने रक्तदान केले की सहा जणांना त्याचा उपयोग होतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे.”
- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य
चौकट
लस घेतल्यावरही करा रक्तदान
“लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते. कोरोनातून बरे झाल्यावर २८ दिवसांनी रक्तदान करता येते. ४५ किलोपेक्षा जास्त वजन आणि १२.५ मिलिग्रामपेक्षा जास्त हिमोग्लोबिन असलेल्या महिला आणि ५० किलोपेक्षा जास्त वजन आणि १३ मिलिग्रामपेक्षा जास्त हिमोग्लोबिन असलेले पुरुष रक्तदान करू शकतात. १८ ते ६० या वयोगटतील नागरिक रक्तदानासाठी पात्र ठरतात.”
- डॉ. अनिकेत देशपांडे, जनरल फिजिशियन