पुस्तकांची तुला, धान्याची तुला ऐकली असेल, पण चिमुकलीची तर चक्क बियांनी वृक्षतुला!
By श्रीकिशन काळे | Published: June 15, 2023 03:05 PM2023-06-15T15:05:40+5:302023-06-15T15:07:23+5:30
चिमुकलीच्या वाढदिवशी अनोखी भेट, बियांपासून आता रोपे तयार करून ते अनेक ठिकाणी लावण्यात येणार
पुणे: पुस्तकांची तुला, धान्याची तुला ऐकली असेल, पाहिली असेल, पण एका पर्यावरणप्रेमी पालकाने आपल्या चिमुकलीची तुला देशी बियांनी केली. त्या बियांपासून आता रोपे तयार करून ते अनेक ठिकाणी लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धन करण्यास हातभार लागणार आहे.
कित्येक वर्षांपासून तुला करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. पण त्या तुलेमध्ये बराच बदल होत गेला. पूर्वीच्या काळी राजा-महाराजा सोन्या-चांदीची तुला करत असत. त्यानंतर मग धान्याची तुला करण्याची परंपरा आली. श्रीमंत माणसं वाढदिवशी अन्नधान्य तुला करून ते गरीबांना वाटत. तशी आजही काही प्रमाणात ही तुला होते. तसेच आधुनिक विचारांची लोकं आणि वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांची तुला काही वर्षांपासून लोकप्रिय होत आहे. त्यातून पुस्तके वाटप होतात आणि वाचनसंस्कृतीला वाव मिळतो. आता त्यातही बदल होऊन नव्या काळाशी सुसंगत अशी तुला करण्यावर भर दिला जात आहे.
पर्यावरणप्रेमी सुमित राठोड यांनी आपल्या चिमुकल्या मुलीच्या वाढदिवसी देशी बियांची तुला केली. त्यामुळे त्यांचे चांगलेच कौतूक होत आहे. तसेच इतर ठिकाणी आता असा उपक्रम राबविण्यावरही भर देण्यासाठी प्रयत्न होत आहे. सुमित राठोड यांनी तुला केलेल्या बिया स्वत:च्या परिसरात लावणार आहेत. तसेच काही बिया महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनीचे प्रिया व सुनील भिडे या दाम्पत्याकडे आणि देवराईचे रघुनाथ ढोले यांच्याकडे देण्यात येणार आहेत. इथे या बियांपासून रोपे तयार होतील. त्यानंतर ठिकठिकाणी वाटप केले जाईल.
ही तुला अतिशय समृध्द करणारी
सुमित राठोड यांनी आपल्या लेकीच्या वाढदिवसी केलेला हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. मंदिरात तुलाभार करून अन्नदान करण्याची परंपरा आपल्यालात आहेच. तशी बीज तुला करून वृक्षांच्या बिया सुयोग्य हातात गेल्यास ही वृक्ष चळवळ मोठी होण्यास हातभार लागेल. इतरांनी देखील याचा अवलंब केला पाहिजे. ही तुला अतिशय समृध्द करणारी आहे. पालकांनी याचा जरूर विचार करावा. - प्रिया भिडे, महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनी
महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीतर्फे बीजांकूर अभियान राबविले जात आहे. त्यात वनस्पतींच्या बिया संकलित करून संस्थेकडे द्यायच्या आहेत. किमान पाच प्रकारच्या बिया हव्यात. त्या दिल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याला राज्यातून प्रतिसाद मिळत आहे.