'तुम्ही जादुटोणा करता', पोलिसांकडे तक्रार करेल' अशी धमकी देऊन पुजाऱ्याला १ लाखांना लुबाडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 04:01 PM2021-12-05T16:01:51+5:302021-12-05T16:02:56+5:30
तुम्ही भोंदुगिरी करता जादुटोणा करता अशी मी तुमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे. पोलीस तुम्हाला अटक करतील अशी भिती घातली. तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिली.
पुणे: तुम्ही भोंदुगिरी करता, जादुटोणा करता, तुमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची धमकी देऊन एका पुजाऱ्यास १ लाख रुपयांना लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. विनायक अधिकराव लावंड आणि अभिजित गोपीचंद दरेकर (दोघेही रा. संभाजीनगर, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी लोणीकंद मधील एका ५२ वर्षाच्या पुजाऱ्यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २९ सप्टेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान घडला आहे. फिर्यादी हे पुजारी आहेत. ते देवीचे भक्त आहे. त्यांच्याकडे दर्शनासाठी नागरिक येत असतात. आरोपींनी त्यांना मोबाईलवर फोन करुन ते प्रत्यक्ष भेटून धमकावले. ‘‘तुम्ही भोंदुगिरी करता, जादुटोणा करता, अशी मी तुमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे. पोलीस तुम्हाला अटक करतील,’’ अशी भिती घातली. तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिली.
‘‘तुमची पोलिसांकडे तक्रार करायची नसेल तर तुम्ही मला ५० हजार रुपये द्या, ’’असे धमकावले. त्यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर ४५ हजार रुपयांची एक तोळ्याची सोन्याची अंगठी घेतली. तसेच ५ हजार रुपये घेतले. त्यांच्या या त्रासाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडे या पुजाऱ्याने तक्रार दिली होती. आरोपी यांनी त्यांना पुन्हा फोन करुन पैशांची मागणी केली. तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ च्या पथकाने लाेणीकंदमध्ये सापळा रचला. दोघे जण पैसे घेण्यासाठी या पुजाऱ्यांच्या घरी आले असताना शनिवारी सायंकाळी दोघांना पोलिसांनी पकडले. पोलीस उपनिरीक्षक टेंगले तपास करीत आहेत.