तुम्हांला गावकऱ्यांनी ‘सरपंच ’ म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे : चंद्रकांत दळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 18:26 IST2019-03-12T18:23:52+5:302019-03-12T18:26:48+5:30
सरपंच पदाचा कार्यकाल संपला तरीही गावात तुम्हाला सरपंच म्हणूनच ओळखले गेले पाहिजे, असे काम सर्व सरपंचांनी करण्याची गरज आहे.

तुम्हांला गावकऱ्यांनी ‘सरपंच ’ म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे : चंद्रकांत दळवी
पुणे : गावाची आर्थिक उन्नती, भौगोलिक विकास, मानवी विकास करणे आणि गावातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा दृष्टीकोन समोर ठेवून सरपंचांनी आपल्या कार्यपध्दतीत आवश्यक बदल केले पाहिजेत. तसेच सरपंच पदाचा कार्यकाल संपला तरीही गावात तुम्हाला सरपंच म्हणूनच ओळखले गेले पाहिजे, असे काम सर्व सरपंचांनी करण्याची गरज असल्याचे माजी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.
गावात पायाभूस सुविधा निर्माण करण्याबरोबरच गावातील प्रत्येक कुटुंबांना शेतीबरोबर एक जोड धंदा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दूध उत्पादन किंवा शेळीपालन हा उपयुक्त जोड धंदा आहे, असे नमूद करून दळवी म्हणाले,गावात विकास कामे करण्यासाठी शासनाच्या ९५ टक्के योजना उपयोगी पडतात. त्यामुळे पाण्याची सुविधा नसल्यास पाणलोट विकासाची कामे,भूजल पातळी वाढवून गावातील शेतीला आवश्यक पाणी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. तसेच गावातील महिलांच्या क्रयशक्तीचा गावाच्या विकासाठी उपयोग करून घेणे गरजेचे आहे. गावातील नागरिकांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देवून त्याची परत फेड करण्याकडेही लक्ष द्यावे.
सरपंचांना सल्ला देताना चंद्रकांत दळवी म्हणाले, सरपंचांनी गावात १२ ते १५ तास काम केले तरीही ते कमीच आहे.गावात पाच वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला सरपंच म्हणूनच ओळखले पाहिजे. तसेच त्यानंतर गावातील एक जबाबदार कार्यकर्ता आणि सन्माननिय नागरिक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाईल. मी माझा निढळ या गावात सुमारे ३५ वर्षांपासून काम करत आहे. निढळ आणि हिरवे बाजार आणि राळेगण या गावातील नागरिकांची कार्यशाळा घेवून विकास कामांची माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे सरपंचांनी चांगले काम करणा-या गावांना भेटी देवून त्यांच्या कार्यापध्दतीचा अभ्यास करावा.