तुम्हीच करा अभ्यास आणि सांगा आजचे हवामान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:01+5:302021-09-19T04:12:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: ‘विज्ञान भारती पुणे’च्या प्रत्येक शाळेत वेधशाळा या उपक्रमातील पहिली शाळा ग्राममंगल मुक्तशाळा (ता. डहाणू) इथे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ‘विज्ञान भारती पुणे’च्या प्रत्येक शाळेत वेधशाळा या उपक्रमातील पहिली शाळा ग्राममंगल मुक्तशाळा (ता. डहाणू) इथे रविवारी (दि.१९) सुरू होत आहे. या शाळेमध्ये हवामानाचा अंदाज रोज समजणार आहे.
विज्ञान भारतीच्या पुणे शाखेने ही माहिती दिली. सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा मागोवा घेऊन तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा यांची स्थानिक उपयुक्त माहिती शेतकरी बांधवांना करून देईल असा हा प्रकल्प आहे. पावसाचा अंदाजही त्यावरून काढता येणार आहे.
ही वेधशाळा लोकसहभागातून निर्माण झाली. त्याचे तंत्रज्ञान सर्वांसाठी विनामूल्य आहे. थोड्याशा अभ्यासानंतर परिसरातल्या महाविद्यालयातील अभियांत्रिकी, विद्युत शाखेचे विद्यार्थी आपल्या परिसरातील गरजेनुसार ही वेधशाळा तयार करू शकतील. दुर्गम भागातील गावांमधील शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनाही हा प्रकल्प हाताळता येईल. शालेय मुले, नागरिक प्रकल्पाचे पालक असतील. त्यासाठी त्यांना हाताळणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पुणे वेधशाळेतील हवामान अभ्यासक जीवनप्रकाश कुलकर्णी, विलास रबडे यांनी यासाठी विज्ञान भारतीला तांत्रिक साह्य केले. संपूर्ण केंद्र स्वनियंत्रित सौर उर्जेवर चालते. इंटरनेटने जोडलेले आहे. दर दहा सेकंदाने त्याची माहिती अद्ययावत होते व त्याच्या सांकेतिक स्थळावरून मोबाइलमध्ये पाहता येते अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.