अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली; धंगेकरांचा मोहोळांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 07:01 PM2024-05-22T19:01:49+5:302024-05-22T19:02:42+5:30
दोन कुटुंब उध्वस्त झाले असून त्यांच्या घरातली २ कमावते गेलेत, त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय....?
पुणे : बड्या बापाच्या बिघडलेल्या पोराने आलिशान पोर्शे गाडीने मध्यरात्री केलेल्या अपघातात दोन जणांचा बळी गेला. त्याची कायदेशीर कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे या प्रकरणावरून पुणे शहर लोकसभेतील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये जुंपली आहे. रवींद्र धंगेकर व मुरलीधर मोहोळ या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांवर समाजमाध्यमातून शाब्दिक आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन या प्रकरणात पोलिस आयुक्तांना दिलेल्या आदेशावरून ही धुळवड सुरू झाली. फडणवीस यांनी पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच संबंधित मुलावर ३०४ कलम लावण्यात आल्याचे म्हटले होते. धंगेकर यांनी यावर फडणवीस पुणेकरांची दिशाभूल करत असल्याची टीका केली. पोलिसांनी या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) मध्ये ३०४ कलम लावलेलेच नव्हते, ते नंतर लावण्यात आले, तरीही फडणवीस असे सांगतात तर ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा प्रश्न धंगेकर यांनी त्यांच्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये केला. पुणेकरांनो हे लक्षात घ्या, नाहीतर ही कीड पुण्याचा नाश करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
मोहोळ यांचे प्रत्युत्तर
धंगेकर यांच्या या पोस्टला लगेचच महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले. ‘खोटे नॅरेटिव्ह सेट करणे सोडून द्या, त्यासाठी तुम्ही काहीही करू शकता, आताच्या निवडणुकीतही तुम्ही तेच केले व या संवेदनशील प्रकरणातही तेच करत आहेत, फडणवीस यांनी सांगितले तेच खरे आहे असे म्हणत मोहोळ यांनी पोलिसांच्या त्या ‘एफआयआर’ची कॉपीच पोस्ट केली आहे. लोक तुम्हाला तुमच्या अशा कृतीमुळेच नाकारतात, त्याचा विचार करा, असे मोहोळ यांनी म्हटले आहे.
तरी म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे.
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 22, 2024
आता तुम्हाला F.I.R आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का...?
आमचं पहिल्या दिवसापासून एकच सांगणे आहे की F.I.R मध्ये 304 लावण्यात… https://t.co/aVUjKqdt4Tpic.twitter.com/vqS3Xfoz4M
धंगेकरांचे पुन्हा ट्विटरवरून प्रत्युत्तर
रवींद्र धंगेकर व मुरलीधर मोहोळ या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांवर समाजमाध्यमातून शाब्दिक आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. आता धंगेकरांनी ट्विट करत पुन्हा मोहोळ यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे. आता तुम्हाला F.I.R आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का...? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
... तर हि घटना घडली नसती
आमचं पहिल्या दिवसापासून एकच सांगणे आहे की F.I.R मध्ये 304 लावण्यात आलेला नाही. का नाही लावला...? सोबत पहिली F.I.R कॉपी जोडतोय. नीट वाचून घ्या. इथ २ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांच्या घरातली २ कमावते लोकं गेले आहेत त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय....? पुणेकर म्हणून तुम्ही पुण्याच्या जनतेसोबत राहाल अशी माझी अपेक्षा होती. पण आतापासूनच बिल्डर अन पोलिसांच्या चरणी आपली निष्ठा वाहत आहात. 3-4 वाजेपर्यंत पोलिसांना माहिती असताना पब चालतात, तेव्हा कुठं गेलेलात? गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते तर हि घटना घडली नसती असेहि धंगेकरांनी ट्विट करत सांगितले आहे.