तू नट होशील! पुण्याच्या एका हस्तरेषाकाराने वर्तविलेले भविष्य खरे ठरले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:10+5:302021-07-08T04:09:10+5:30
पुणे : अभिनेते युसूफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांच्या जीवनासह करिअरची पाळंमुळं महाराष्ट्रात रुजली आहेत. ऐकून कदाचित खोटं वाटेल, ...
पुणे : अभिनेते युसूफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांच्या जीवनासह करिअरची पाळंमुळं महाराष्ट्रात रुजली आहेत. ऐकून कदाचित खोटं वाटेल, पण पुण्यातच एका हस्तरेषाकाराने ‘तू नट होशील’ असे सांगितले होते आणि ते भविष्य कालांतराने खरे झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतले ते पहिले सुपरस्टार ठरले.
नाशिकमधील देवळाली येथे शिक्षण घेत असताना वडिलांच्या व्यवसायात नुकसान झाल्यामुळे कॉलेजच्या तिसऱ्या वर्षातच त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. तेव्हा आर्मी कॉॅन्ट्रॅक्टर असलेल्या वडिलांच्या मित्राने पुण्यातील खडकीच्या ब्रिटिश सैनिकांच्या कँटिनमध्ये त्यांना नोकरी लावली. तिथे असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करीत असताना त्यांना ३६ रुपये पगार मिळायचा. मात्र अधिक पैसा कमविण्यासाठी त्यांनी पुण्यात फळांचा देखील स्टॉल टाकला. शहरात त्यांच्या फळांची विक्री करण्यासाठी सेल्सबॉय जात असत. २२ रुपये त्यांची कमाई होत असे. युसूफ यांच्या आयुष्यातील ते अत्यंत आनंदाचे दिवस होते. त्या काळात त्यांनी खूप चांगला पैसा कमावला. घरी देखील ते पैसे पाठवत असत. ब्रिटिश सैनिकांबरोबर ते फुटबॉलदेखील खेळत असत. त्यानंतर ते मुंबईला गेले. पण पुण्याशी त्यांचे ॠणानुबंध जुळले ते अगदी कायमचेच! महाराष्ट्रात शिक्षण झाल्यामुळे मराठीवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात भाषण किंवा संवाद साधताना त्यांना विशेष कधी अडचण जाणवली नाही.
एफटीआयआयमध्ये पहिल्यांदा पाहिला ‘मुघले ए आझम’
भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे ’मुघले ए आझम’. दिलीपकुमार यांचा नैसर्गिक अभिनय आणि मधुबालाचे आरसपानी सौंदर्य यामुळे आजही हा चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल! हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल १८ वर्षांनी दिलीपकुमार यांनी एफटीआयआयच्या मेन थिएटरमध्ये पहिल्यांदा मुघले ए आझम हा चित्रपट पाहिला होता. १९७८ साली दिलीपकुमार यांनी एनएफएआयचे पहिले संचालक पी. के. नायर यांच्याकडे १५ अभिजात कलाकृती पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यांची पत्नी सायराबानू यांनी या १५ चित्रपटांची निवड केली. पुढील १५ दिवस त्यांनी या कलाकृतींचा आस्वाद घेतला. ’मुघले ए आझम’ हा चित्रपट त्यांनी पत्नीसमवेत पाहिला. याशिवाय एफटीआयआयच्या १४ डिसेंबर १९७७ मध्ये झालेल्या पदवीप्रदान समारंभाला देखील दिलीपकुमार उपस्थित होते. एफटीआयआयकडे दिलीपकुमार यांच्याशी निगडित अविस्मरणीय आठवणी आहेत. त्यांनी पदवीप्रदान समारंभाचे अध्यक्षपद भूषविल्याबद्दल आम्ही त्यांचे कायमस्वरूपी ॠणी आहोत, अशी भावना एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी व्यक्त केली.
पिफच्या पहिल्या जीवनगौरव पुरस्काराचे दिलीपकुमार मानकरी
पुणे आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये २००२ (पिफ) दिलीपकुमार यांना पहिला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. तेव्हा त्यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये संवाद साधून रसिकांची मने जिंकली होती.
-----------------------------------------