तुम्हाला १० ते १२ हजार प्रति आठवडा पगार मिळेल; नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 05:55 PM2023-01-18T17:55:54+5:302023-01-18T17:56:33+5:30
डेक्कन जिमखान्यावरील सीकेवाय, केके वाय कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
पुणे : नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणांना पॅकेज घेण्यास भाग पाडून कोणतेही प्रशिक्षण न देता अनेक तरुणांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी सी के वाय व के के वाय कंपनीचे कर्मचारी चंदनकुमार यादव आणि कुंदनकुमार यादव व इतर (डेक्कन हाईटस, डेक्कन जिमखाना) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याला एका महिलेला २४ डिसेबर रोजी फोन आला. तिने नॅसविझ कंपनीबाबत माहिती देऊन नोकरी करायची असेल तर डेक्कन जिमखान्यावरील कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानुसार हा तरुण कंपनीत गेला. त्याला कंपनीत १० ते १२ हजार रुपये प्रति आठवडा पगार मिळेल, असे सांगितले. त्यांची तीन पॅकेजस आहेत. त्यापैकी कोणतेही एक पॅकेज घ्यावे लागेल, असे सांगितले. तुम्ही कंपनीत भरती झाल्यानंतर या पॅकेजेसचे मार्केटिंगचे काम करावे लागेल. त्यानंतर त्यांना १४ हजार ५०० रुपये अॅडव्हान्स भरायला सांगितले. तेवढे पैसे नसल्याचे सांगितल्यावर तुम्ही आता कंपनीचे मेंबर झाले आहात. त्यामुळे तुम्हाला पैसे भरल्याशिवाय येथून जाता येणार नाही, असे सांगून त्यांना बसवून ठेवले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असलेले १० हजार ५०० रुपये भरले. उरलेले पैसे दोन दिवसात भरा, असे सांगून त्यांचे आधार कार्ड घेतले. त्यांना पैसे भरल्याची पावतीही देण्यात आली नाही. त्यानंतर ते उरलेले ४ हजार रुपये भरण्यासाठी गेले असताना नॅसविझ या कंपनीच्या पत्त्यावर सीकेवाय एंटरप्रायझेस या नावाचे कार्यालय दिसले. त्यांनी तेथील व्यक्तीकडे पैसे भरले. त्यांना बेसिक ट्रेनिंग दिले जाईल, उद्यापासून या असे सांगण्यात आले. त्यानंतर ते ५ ते १० जानेवारी रोज दुपारी १२ ते ४ जात होते. परंतु त्यांना कोणतेही ट्रेनिंग देण्यात आले नाही. त्यांच्याप्रमाणेच इतरांना नोकरी देण्याच्या नावाखाली पॅकेजचे पैसे घेऊन कार्यालयात बसवून ठेवले जात असल्याचे त्यांना आढळून आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी डेक्कन पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.