'तुला मारून टाकल्यानंतर समजेल...’ गैरसमजातून वाद, चाकूने वार; खडकीतील घटना
By भाग्यश्री गिलडा | Published: January 29, 2024 05:52 PM2024-01-29T17:52:38+5:302024-01-29T17:53:23+5:30
पुणे : दुचाकी नेल्याच्या गैरसमजातून वाद घालून चाकूने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना खडकी परिसरात घडली आहे. ...
पुणे : दुचाकी नेल्याच्या गैरसमजातून वाद घालून चाकूने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना खडकी परिसरात घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी ऋषिकेश ऊर्फ रितू तायडे, हितेश (रा. राजीव गांधीनगर, खडकी बाजार, पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत किरण अनिल खुडे (वय २०, रा. खडकी बाजार) याने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार शनिवारी (दि.२७) सायंकाळी खडकी बाजार येथील गणपती मंदिरासमोर घडला आहे. फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहत असून, एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी (दि.२६) आरोपी रितू याचा मित्र लकी हा दुचाकी घेऊन गेला होता. मात्र, दुचाकी किरण खुडे हा घेऊन गेला आहे, असे आरोपीचा गैरसमज झाला. त्यामुळे रितू आणि किरण यांच्यात वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात धरून शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आराेपीने किरण याच्यावर चाकूने वार केले आणि चाकू हवेत फिरवत परिसरात दहशत पसरवली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भांडवलकर हे करत आहेत.