तरुण व्यावसायिकाने धरणात उडी मारून केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:44+5:302021-05-08T04:11:44+5:30
" माझी गाडी खडकवासला धरणाजवळ लावलेली आहे. मी आत्महत्या करत असून गाडी विकून जे पैसे येतील ते माझ्या आईला ...
" माझी गाडी खडकवासला धरणाजवळ लावलेली आहे. मी आत्महत्या करत असून गाडी विकून जे पैसे येतील ते माझ्या आईला द्या," तसेच 'माझ्या आईची काळजी घ्या', असा व्हॉइस मेसेज चंद्रशेखर पुजारी या व्यावसायिकाने आपल्या चुलतभावाला पाठवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुणे-पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे- पाटील, पोलीस हवालदार रामदास बाबर, दिलीप गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. चंद्रशेखर यांचा सोमवार पेठ येथे हातगाडीवर वडापाव व डोसा विक्रीचा व्यवसाय होता. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या तरुणाने खडकवासला धरणाजवळ येऊन चुलतभावाला अशा प्रकारचा व्हॉईस मेसेज केल्यानंतर चुलतभाऊ व नातेवाइकांनी तातडीने खडकवासला येथे येऊन शोधाशोध केली असता चंद्रशेखर पुजारी याची दुचाकी आढळून आली. त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्यात चंद्रशेखर हरवला असल्याची तक्रार त्यांनी केली होती. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट समजू शकले नाही.