"पुण्यातील तरुण डॉक्टरची धमाल, आयुर्वेद सिगारेट तयार करण्याची केली कमाल"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 03:17 PM2021-12-09T15:17:41+5:302021-12-09T15:18:40+5:30
पुण्यातील डॉ. राजस नित्सुरे यांना आयुर्वेदिक सिगारेट बनविण्याचे भारत सरकारचे पेटंट नुकतेच मिळाले आहे. यापूर्वी दोन-तीन वेळा आयुर्वेदिक सिगारेटचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्यामुळे डॉ. नित्सुरे यांना मिळालेलं पेटंट हे भारतातील पहिलंच आहे
दुर्गेश मोरे
पुणे : कोरोना काळापासूनच नाही, तर तत्पूर्वीही तंबाखूच्या आहारी गेलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. अलीकडे तर सिगारेट ओढण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. या धूम्रपानामुळे दुष्परिणामांनाही समोरे जावे लागते. त्यामुळे आता तंबाखूच्या या व्यसनाला दूर ठेवण्यासाठी आयुर्वेदाची डायमंड थेरपी उपयुक्त ठरणार आहे. पुण्यातील डॉ. राजस नित्सुरे यांना आयुर्वेदिक सिगारेट बनविण्याचे भारत सरकारचे पेटंट नुकतेच मिळाले आहे. यापूर्वी दोन-तीन वेळा आयुर्वेदिक सिगारेटचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्यामुळे डॉ. नित्सुरे यांना मिळालेलं पेटंट हे भारतातील पहिलंच आहे.
दारूचेच नाही, तर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामध्येही वाढ झाली आहे. कोरोनाकाळात तर याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. काहीजण मौज म्हणून, तर काही मानसिक तणाव दूर करण्यासाठी तंबाखू आणि सिगारेटचा वापर करत आहेत. यामुळे कॅन्सरसारख्या रोगांनाही आपण स्वत:हून आमंत्रण देत असल्याचेही आपल्या लक्षात येत नाही. दारूचे व्यसन लागले, तर व्यसनमुक्ती केंद्रातून आपण ते सोडवू शकतो किंवा अनेकजण त्यावर काम करत आहेत. पण तंबाखूचे व्यसन दूर करण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही अथवा तशी केंद्रेही अस्तित्वात नाहीत. मात्र, आता हे तंबाखूचे अथवा धूम्रपानाचे व्यसन दूर करण्यासाठी आयुर्वेदातील डायमंड थेरपी उपयोगी ठरू लागली आहे.
साधारण ६० ते ७० टक्के लाेकांमध्ये सिगारेट, हुक्का, बिडी तसेच तंबाखू खाण्याची सवय आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन तंबाखूमुक्त भारत या अभियानाच्या माध्यमातून पुण्यातील डॉ. राजस नित्सुरे यांनी १० वर्षांपासून तसे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी तंबाखू आणि सिगारेटच्या आहारी गेलेल्या ५०० लोकांवर संशोधन केले. आयुर्वेदातील वाळा, पुदिना, दालचिनी, ज्येष्ठमध, लवंग, गुलाब पाकळी, जटामासी यांसह अन्य १२ ते १५ वनस्पतींपासून एक सिगारेट तयार केली. ही सिगारेट संबंधित लोकांना देण्यात आली. तीन महिन्यात ६० ते ७० टक्के लोकांची दिवसाला सहा ते सात सिगारेट ओढण्याची सवय कमी झाल्याचे संशोधनात आढळून आले. त्यानंतर त्यांनी आयुर्वेदिक सिगारेटही ओढण्याचे बंद करण्यास सांगितले. त्याचाही विपरित परिणाम त्यांच्यावर झाला नाही. एकूण हे संशोधन यशस्वी ठरले असल्याचे डॉ. राजस नित्सुरे यांनी सांगितले.
धूमपान, धूमवर्ती आणि सिगारेट
डॉ. राजस नित्सुरे यांचे आजाेबा वैद्य अनंत नित्सुरे यांनी सर्वात आधी आयुर्वेदातील काही वनस्पतींचा वापर करून कफ कमी येण्यासाठी धूमपान सुरू केले. धूमपान म्हणजे आपण वाफारा घेतो ती पद्धत. पण त्यासाठी वैद्यांसमोरच ही वाफ घ्यावी लागते. त्यामुळे यामध्ये आणखी बदल करण्याची आवश्यकता होतीच. पण त्यादरम्यानच डॉ. राजस यांचे वडील वैद्य उदय नित्सुरे यांना त्यांच्या परदेशातील मित्राने आयुर्वेदिक बिडीची संकल्पना सांगितली. ती तयार करून परदेशात पाठविण्यासाठी विनंतीही केली. त्यानंतर वैद्य उदय नित्सुरे यांनी धूमपानात वापरण्यात येणाऱ्या वनस्पती आणि अन्य काही वनस्पतींचा त्यामध्ये समावेश करून धूमवर्तीची (बीडी) पद्धत सुरू झाली. लोकांकडूनही मागणी वाढू लागल्याने सध्याचा काळ लक्षात घेऊन आणि लोकांमध्ये असणारे सिगारेटचे प्रमाण पाहून डॉ. राजस यांनी धूम्रवर्तीच्याच पद्धतीत थोडा बदल करत आणखी नवीन वनस्पतींचा त्यामध्ये समावेश करून भारतीय बनावटीची आयुर्वेदिक सिगारेट तयार केली.
या आजारांवर उपयुक्त...
कफ, वारंवार शिका येणे, डोके जड वाटणे, कफमुळे डोके दुखणे, मानसिक तणाव दूर करणे, कफमुळे गळ्याचे वरील बाजूस जेवढे त्रास होतात, त्यावर आयुर्वेदिक सिगारेट उपयुक्त ठरत आहे. सिगारेटबरोबर तंबाखूच्या व्यसनापासूनही यामुळे दूर होत असल्याचे समोर आले आहे.
तंबाखूचे व्यसन कमी करण्यासाठी पुण्यात पहिले तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र लवकरच सुरू
''तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही सिगारेट आहे. विशेष म्हणजे आपण त्याचा कधीही वापर करू शकतो आणि बंदही. म्हणजे सुरू अथवा बंद करण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याची गरज नाही. सध्या ही आयुर्वेदिक सिगारेट ठराविक मेडिकल, पान टपऱ्यांमध्ये उपलब्ध आहे. तंबाखूचे व्यसन कमी करण्यासाठी पुण्यात पहिले तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र लवकरच सुरू करणार आहोत असे डॉ. राजस नित्सुरे यांनी सांगितले.''