गुंड गजा मारणे प्रकरण : अभियंता तरुणास मारहाण, तपासात आरोपींची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे
By नम्रता फडणीस | Updated: March 6, 2025 20:23 IST2025-03-06T20:22:38+5:302025-03-06T20:23:14+5:30
तरुणाला कोथरूड परिसरातील भेलकेनगर येथे १९ फेब्रुवारीला रात्री मारणे टोळीतील काही सराईतांनी बेदम मारहाण केली

गुंड गजा मारणे प्रकरण : अभियंता तरुणास मारहाण, तपासात आरोपींची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे
पुणे : अभियंता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजानन मारणे टोळीतील सदस्यांची फिर्यादी तरुणाच्या उपस्थित ओळख परेड करण्यात आली आहे. मात्र पोलिस कोठडीत असलेले आरोपी कोणतीही माहिती देत नसून, उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात दिली.
तरुणाला कोथरूड परिसरातील भेलकेनगर येथे १९ फेब्रुवारीला रात्री मारणे टोळीतील काही सराईतांनी बेदम मारहाण केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी गुंड गजानन पंढरीनाथ मारणे (वय ५८) याच्यासह रूपेश कृष्णराव मारणे, ओमतिर्थ राम धर्म जिज्ञासू (वय ३५), किरण कोंडिबा पडवळ (वय ३१), अमोल विनायक तापकीर (वय ३५. सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली. यातील रूपेश मारणे आणि बाब्या पवार या आरोपींचा पोलिस अद्याप शोध घेत आहेत.
पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने जिज्ञासू, पडवळ आणि तापकीर यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील विलास पठारे यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. विजयसिंग ठोंबरे यांनी बाजू मांडली. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी तीनही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.