Kasba By Election: तरुण पिढीने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 01:11 PM2023-02-26T13:11:25+5:302023-02-26T13:12:30+5:30
निकालाबाबत पुणे जिल्ह्यालाच नाही, तर राज्यालाही उत्सुकता
पुणे : विधानसभेच्या कसबा व चिंचवड या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात, तर चिंचवडमध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे व बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मतदान हा आपला हक्क लक्षात घेऊन असंख्य नागरिक मतदानासाठी बाहेर पडले आहेत.
कसब्यात सकाळी ११ पर्यंत 8.25 टक्के तर चिंचवडमध्ये 10.45 टक्के एवढे मतदान झाले आहे. ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी आवर्जून बाहेर पडताना दिसत आहेत. कसबा मतदार संघात एका ८९ वर्षीय ज्येष्ठानी तरुणांना सल्ला दिला आहे. तरुण पिढीने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. असं ८९ वर्षीय मकरंद देशपांडे म्हणाले आहेत.
जी तरुण पिढी मतदान करत नाही त्यांनी मतदान केले पाहिजे. मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे तरुण पिढीला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितली आहे.
ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सोय
कसब्यातील एकूण मतदारांपैकी १९ हजार मतदार हे ८० वर्षे वयाेगटापुढील आहेत. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी सर्व २७० मतदान केंद्रे तळमजल्यावरच ठेवण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिक, आजारी आणि दिव्यांग मतदारांची सोय होणार आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर चाकाच्या खुर्चीची आणि दोन सहायकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
निकालाची राज्यालाही उत्सुकता
२ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसब्यातील मतमोजणी कोरेगाव मार्क येथील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. चिंचवडमधील मतमोजणी कामगार भवन, थेरगाव इथे होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीने निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे निकालाबाबत पुणे जिल्ह्यालाच नाही, तर राज्यालाही उत्सुकता आहे.