वढू बुद्रुक येथे बिबट्याशी झुंजताना तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:12+5:302021-03-28T04:11:12+5:30

कोरेगाव भीमा : वढु बुद्रुक येथे झकनाईच्या मळ्यात बिबट्याचा हल्ला दोन वेळा परतवताना मनीष आनंदराव शिवले (वय ३९) ...

Young injured while fighting leopard at Wadu Budruk | वढू बुद्रुक येथे बिबट्याशी झुंजताना तरुण जखमी

वढू बुद्रुक येथे बिबट्याशी झुंजताना तरुण जखमी

Next

कोरेगाव भीमा : वढु बुद्रुक येथे झकनाईच्या मळ्यात बिबट्याचा हल्ला दोन वेळा परतवताना मनीष आनंदराव शिवले (वय ३९) हा तरूण शेतकरी जखमी झाला. या तरूण शेतकऱ्याने आरडाओरडा करून कडवी झुंज देत बिबट्याला अखेर पळवून लावले.

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे झकनाईच्या मळ्यात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मनीष शिवले हे शेतातून घरी येत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. जोरदार प्रतिकार करताना शिवले यांच्या डोक्याला व इतरत्र खोलवर जखमा झाल्या. या झटापटीनंतर पुन्हा बिबट्याने हल्ला चढवल्याने शिवले यांच्या दंडाला व अंगावर दात व नख्यांमुळे अनेक जखमा झाल्या. शिवले यांनी जोरदार आरडाओरडा करीत

बिबट्याला दोन वेळा जोरात ढकलल्याने बिबट्या पळून गेला.

जखमी व रक्तबंबाळ अवस्थेतही शिवले यांनी स्वतः चालत घरी येत सर्वांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांना तातडीने उपचारासाठी कोरेगावात खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले.उपचारादरम्यान शिवले यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वढू बुद्रकुमध्य बिबट्याचे सातत्याने हल्ले, उपाययोजना नाही

बिबट्याकडून वढू परिसरात वारंवार माणसे तसेच पाळीव प्राण्यांवर वारंवार हल्ले होत असूनही वन विभागाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याबद्दल स्थानिकांमध्ये नाराजी आहे. काही दिवसांपूर्वीच येथील स्थानिक तरुण लौकिक शिवले व साहिल खांदवे यांच्या दुचाकीवर बिबटयाने हल्ला केला होता, तशिवले यांच्या गाईवरही यापूर्वी बिबट्याने हल्ला करून गाय मारली होती.सातत्याने घडणाऱ्या अशा गंभीर घटनांमुळे स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून वनविभागाने गांभीर्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान वनविभागाच्या वतीने बिबट्या पकडण्यासाठी तत्काळ पिंजरा बसवला असल्याचे वन अधिकारी म्हसेकर यांनी सांगितले.

फोटो : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे झकनाईच्या मळ्यात शुक्रवारी सायंकाळी बिबट्याच्या हल्यात तरुण शेतकरी जबर जखमी झाला.

Web Title: Young injured while fighting leopard at Wadu Budruk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.