व्हिडिओ व्हायरल करून महिलेची बदनामी, विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 07:25 PM2021-03-21T19:25:44+5:302021-03-21T19:42:19+5:30
महिलेला दमदाटी करून केला व्हिडिओ रेकॉर्ड
पिंपरी : चुलत भावाकडे आलेल्या महिलेशी लगट करून मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ व्हायरल करून महिलेची बदनामी व विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. कासारवाडी येथे ११ नोव्हेंबर २०२० रोजी हा प्रकार घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने याप्रकरणी शनिवारी (दि. २०) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश रेड्डी राठोड (वय २५, रा.), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या चुलत भावाकडे राहण्यास होती. त्यावेळी ती पत्र्याच्या शेडमध्ये एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी तेथे आला. फिर्यादी महिलेला दमदाटी करून तिच्याशी लगट केली. मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. फिर्यादी महिलेने विरोध करून जोराने ओरडल्यावर आरोपी पळून गेला. आता तुला काय करायचे ते कर, मी तुझी शूटिंग काढली आहे, कोणाला काय सांगितले तर मी तुला बघून घेईन, असे म्हणून दमदाटी करून आरोपी पळून गेला. फिर्यादी महिला मूळ गावी गेली असता तेथे येऊन आरोपीने पुन्हा दमदाटी केली. मोबाईल मध्ये केलेले शूटिंग कुठून तरी तीन ते चार दिवसांपूर्वी सगळ्यांच्या मोबाईल फोनवर पाठवून फिर्यादी महिलेची बदनामी केली. मनास लज्जा वाटेल, असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला.