Police Bharti: पोलीस भरतीत डमी उमेदवाराला परीक्षा देण्यास लावणार्या तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 02:38 PM2022-01-12T14:38:04+5:302022-01-12T14:38:57+5:30
राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत डमी उमेदवाराला बसवून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे
पुणे : राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत डमी उमेदवाराला बसवून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. विक्रम सुरेश सोनवणे (रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने बसविलेल्या उमी उमेदवारावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दौंड एस आर पी एफ ग्रुप ७ चे अधिकारी दत्तात्रय भोंगळे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १९ या अहमदनगरमधील कुसडगाव येथील सशस्त्र पोलीस भरती प्रक्रिया २०१९ चा विक्रम सोनवणे हा उमेदवार होता. ही परीक्षा १२ डिसेंबर २०२१ रोजी कसबा पेठेतील आर सी एम गुजराथी कॉलेज येथे घेण्यात आली. या लेखी परीक्षेला विक्रम सोनवणे याने आपल्या जागी डमी उमेदवाराला बसविले होते. सोनवणे या परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्यानंतर सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता त्यात सोनवणे याने डमी उमेदवार बसवून लेखी परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भोंगळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हा प्रकार फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तो फरासखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.