Pune Crime: छातीत लाथा घातल्यानं तरुणाचा मृत्यू; लोणी काळभोर मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 13:07 IST2021-09-26T13:07:37+5:302021-09-26T13:07:53+5:30
टेम्पो आणि दुचाकीच्या किरकोळ अपघातात वाद झाला

Pune Crime: छातीत लाथा घातल्यानं तरुणाचा मृत्यू; लोणी काळभोर मधील घटना
लोणी काळभोर : टेम्पो आणि दुचाकीच्या किरकोळ अपघातात वाद झाल्यानं टेम्पो चालकाने दुचाकीस्वाराच्या छातीत लाथा घातल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना थेऊर येथे घडली आहे. सुंदर शिवा पवार ( वय २४, रा. आलिफनगर ) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
याप्रकरणी त्यांचा भाऊ विठ्ठल शिवा पवार ( वय ३५ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक आदित्य सुधीर धाराशिवकर ( वय २३ रा. कामधेनु इस्टेट, मंत्री मार्केट समोर, हडपसर ) याला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सुंदर आणि त्याचे दोन मित्र दुचाकीवरून थेऊरच्या दिशेनं जात होते. त्याठिकाणी एका मिसळ हॉटेलच्या समोरून थेऊरच्या दिशेनं जाणाऱ्या टेम्पोचा सुंदरच्या दुचाकीला कट लागून किरकोळ अपघात झाला.
सुंदरने टेम्पो चालकास विचारणा केली असता दोघांत वादावादी सुरु झाली. त्यानंतर टेम्पो चालक धाराशिवकर यानं सुंदरच्या छातीत ४ ते ५ लाथा मारल्या. त्यामुळे तो जमिनीवर बेशुध्द होऊन पडला. त्यावेळी धाराशिवकर हा पळून जाण्याच्या बेतात असताना सुंदरच्या सोबत असणाऱ्या दोन मित्रांनी आणि त्याठिकाणी हजार असणाऱ्या एका व्यक्तीनं टेम्पो चालकांस पकडून ठेवले.
सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सुंदर यांस टेम्पोमध्ये घालून तात्काळ थेऊर गावातील डॉ सैय्यद यांच्याकडे नेले. तो अत्यावस्थ असल्यानं त्यांनी मोठया हॉस्पिटल मध्ये त्यास हलविण्यास सांगितले. त्यामुळे सुंदरला लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून तो उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केले.