इमारती शेजारून गेलेल्या विद्युत तारांचा शॉक बसल्याने दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 01:16 PM2021-12-21T13:16:45+5:302021-12-21T13:16:57+5:30
तारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेतली नसल्याने इमारतीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर : इमारतीच्या शेजारून गेलेल्या विद्युत उच्चदाबाच्या तारांमुळे प्रवाहाचा शॉक बसून आणि दुसऱ्या मजल्यावरून पडून एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. इमारती शेजारून गेलेल्या तारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेतली नसल्याने इमारतीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यादुर्घटनेत शुभम संचित परब ( वय २१ ) याचा मृत्यू झाला आहे. त्याचे मृत्यूस कारणीभूत ठरलेचे कारणांवरून संभाजी दादासाहेब भाडळे ( वय ४२, रा. उरुळी देवाची, ता. हवेली ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार १४ नोव्हेंबर रोजी घडला आहे. त्यादिवशी उरुळी देवाची पोलीस चौकीस नियंत्रण कक्षाला पुण्यातून जुना पालखी रोड येथे एकजण इमारतीवरुन खाली पडलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार सागर वणवे व जोशी हे त्याठिकाणी गेले. त्यांनी शुभम परबला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मरणाचे कारण हे हेड इंजुरी अर्टिकल प्रिझर्व केमिकल अनालायझर असे नमुद होते. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
या मृत्यु प्रकरणात घटनास्थळी असणाऱ्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम ज्या बांधकाम इमारतीच्या दुसऱ्या मजलाल्यावर गॅलरीत उभा होता. तिच्या शेजारून उच्चदाब विद्युत प्रवाहाच्या तारा गेल्या होत्या. परंतु इमारतीच्या मालकाने त्याबाबत कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेतली नव्ह्ती. त्यावेळी शुभम हा दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत उभा राहिला असताना या विद्युत प्रवाहाच्या तारांचा शॉक बसून तो खाली पडला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे साक्षीदारांनी दिलेल्या जबाबावरून सिद्ध झाल्याने इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.