कालव्याच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू ; पुण्याजवळील राजगुरुनगर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 07:01 PM2020-05-10T19:01:04+5:302020-05-10T19:03:37+5:30
कालव्याच्याकडेने जाताना दुचाकी घसरुन पाण्यात पडून युवकाचा मृत्यू झाला
राजगुरुनगर: चासकमान कालव्याच्या पाण्यात बुडुन युवकाचा मृत्यु झाला. पंचशील विठ्ठल फलके (वय ४५ )रा स्वामी समर्थ सोसायटी,राजगुरूनगर असे मयत युवकांचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मयत पंचशील याला पोहता येत नव्हते.कालव्याच्या दक्षिण भरावाच्या पट्टीवरून दुचाकीने (क्र एम एच १४ ई डी ५९३९) कामानिमित्त चालला होता. भरावाच्या खड्यात दुचाकी आदळून गाडीवरचा ताबा सुटला. दुचाकी भरावाच्या कडेला पडली. पंचशील मात्र थेट वाहत्या पाण्यात पडला. ही सर्व घटना कालव्यावर धुणे धुण्यासाठी आलेल्या काही महिलांनी पाहिली. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र आजूबाजूला पोहणारे कोणीही नव्हते. काही अंतर गेल्यावर तो बुडाला. तालुका क्रीडा संकुल जवळ थिगळस्थळ परिसरात शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरातील अनेक युवक व नागरीक घटनास्थळी जमले होते
गावातील पोहणाऱ्या दहा युवकांनी राजगुरूनगर ते टाकळकरवाडीपर्यंत पाण्यात शोध घेतला. मात्र रात्री उशिरा पर्यंत मृतदेह मिळुन आला नाही.आज सकाळी एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. रेटवडी येथे सातारकावस्ती येथुन जाणाऱ्या डाव्या कालव्यात झुडपाला फलके यांच्या मुत्यूदेह अडकल्याचे दिसुन आले. युवकांच्या मदतीने मुत्यूदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्या मागे पत्नी, मुलगी,सहा वर्षांचा मुलगा,भाऊ,वृद्ध आई वडील असा परिवार आहे.राजगुरूनगर नगरपरिषदेच्या १८ कोटी रुपयांची पाणी योजना व ३२ कोटी रुपयांची बंदिस्त गटार योजना अंतिम टप्प्यात आहे. हे काम करण्यात पंचशील याचा मोलाचा सहभाग होता. असे जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांनी सांगितले.