पुण्यातील खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; मित्रांची हुल्लडबाजी पडली महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 09:31 PM2022-04-03T21:31:50+5:302022-04-03T21:31:58+5:30
खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली
शिवणे : खडकवासलाधरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. योगेश नवनाथ नवले (वय १८, बिबवेवाडी, पुणे) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.
योगेश हा मूळचा अहमदनगरचा असून कामासाठी पुण्यात आला होता. रविवारी सुटी असल्यामुळे तो त्याच्या इतर चार मित्रांबरोबर खडकवासलाधरणात पोहण्यासाठी आला होता. सर्व मित्र पोहत असताना हुल्लडबाजी करत होते. पोहून झाल्यावर अंगाला माती लावली म्हणून अंग धुण्यासाठी पुन्हा पाण्यात गेलेला योगेश पाण्यात दिसेनासा झाला, म्हणून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. तेव्हा तेथून जवळच कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस विलास बांबळे, हवालदार मकसूद सय्यद, होमगार्ड शांताराम राठोड, प्रवीण घुले व विजय भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत नलावडे यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. नांदेड सिटी अग्निशामक केंद्राचे सुजित पाटील, वाहनचालक अभिषेक गोणे, ओंकार इंगवले, फायरमन पंकज माळी, किशोर काळभोर, योगेश मायनाळे, अक्षय काळे, सूरज इंगवले या जवानांनी योगेशचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीस पुढील तपास करत आहेत. गेल्या दोन दिवसात पाण्यात बुडण्याची ही दुसरी घटना असून अशा घटना रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत यावेळी प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केले.