Pune Crime | आळंदीत बिल्डींगच्या टेरेसवरून उडी घेत तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 21:16 IST2023-03-21T21:15:32+5:302023-03-21T21:16:28+5:30
ही घटना पहाटे चारच्या सुमारास आळंदीतील भाजी मंडई जवळील दत्त मंदिर परिसरात घडली...

Pune Crime | आळंदीत बिल्डींगच्या टेरेसवरून उडी घेत तरुणाची आत्महत्या
आळंदी (पुणे) : आळंदी - देवाची (ता. खेड) येथे सत्तावीस वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत बिल्डींगच्या टेरेसवरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी (दि.२१) पहाटे चारच्या सुमारास आळंदीतील भाजी मंडई जवळील दत्त मंदिर परिसरात घडली.
संदेश उर्फ अक्षय श्रीकृष्ण बेलसरे (वय २७ मुळगाव रा. तुळजापुर ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संदेश हा मजुरीचे काम करत होता. मात्र तो दररोज जास्त दारू पिऊन विनाकारण वेडयासारखे बडबड करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान सोमवारी रात्री नऊच्या सुमारास संदेश हा दारू पिऊन मला मरायचे आहे, अशी मोठमोठ्याने बडबड करत होता. त्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास संदेशने बिल्डींगच्या टेरेसवरून खाली उडी मारून आत्महत्या केली.
याप्रकरणी समीर शकीर अन्सारी वय (२० वर्षे) यांनी पोलिसांत खबर दिली आहे. दरम्यान आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.