शेतात बोलावून महिलेची हत्या केल्याप्रकरणी तरुणास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 06:52 AM2017-10-07T06:52:45+5:302017-10-07T12:06:55+5:30
‘शेतात गाय शिरली आहे’, असा निरोप पाठवून महिलेला तिच्याच शेतात बोलावून खून करून दागिने लांबविणाºयाला जन्मठेप आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा
पुणे : ‘शेतात गाय शिरली आहे’, असा निरोप पाठवून महिलेला तिच्याच शेतात बोलावून खून करून दागिने लांबविणा-याला जन्मठेप आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. सी. भगुरे यांनी आदेश दिला आहे.
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली पंढरीनाथ झांबरे (वय २४, रा. टकलेनगर, मांजरी बुद्रुक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. हरुबाई नारायण घुले (वय ६०, रा. टकलेनगर, मांजरी बुद्रुक) यांच्या खूनप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत हरूबाई यांचा मुलगा दिगंबर नारायण घुले (वय २२) यांनी फिर्याद दिली. ही घटना मांजरी बुद्रुक, टकलेनगर येथील फिर्यादीच्या शेतात १० डिसेंबर २०१२ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली होती.
झांबरे हा चोरीच्या उद्देशाने मृत हरूबाई यांच्यावर पाळत ठेवून होता. घटनेच्या दिवशी त्याने १५ वर्षीय मुलाद्वारे शेतात गाय शिरल्याचा निरोप हरूबाई यांना दिला. त्यानुसार त्या त्वरित शेतात गेल्या. त्या वेळी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्यात आली. त्यांना नायलॉनच्या दोरीने बांधून १ लाख १९ हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने काढऊन घेतले. त्यानंतर डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला. हडपसर पोलिसांनी याबाबत तपास करून दोघांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यावर सुनावणी करत न्यायालयाने ज्ञानेश्वर याला खूनप्रकरणी जन्मठेप, १ हजार रुपये दंड आणि जबरी चोरीसाठी ७ वर्षे सक्तमजुरी, १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर, सबळ पुराव्याअभावी एकाची निर्दोष
मुक्तता केली.
या प्रकरणात सरकारी वकील विलास पटारे, सुनील हांडे आणि मच्छिंद्र गटे यांनी १४ साक्षीदार तपासले. त्यामध्ये मृत हरूबाई यांना निरोप देण्यासाठी गेलेल्या १५ वर्षांच्या मुलाची साक्ष आणि गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले दागिने हे पुरावे महत्त्वाचे ठरले. तपासी अधिकारी म्हणून हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार बी. एस. लोखंडे यांनी काम पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार ए. एस. गायकवाड, दादा राऊत यांनी मदत केली.