युवक अडकला जाळ्यात
By admin | Published: May 11, 2016 01:09 AM2016-05-11T01:09:49+5:302016-05-11T01:09:49+5:30
‘हम लष्कर-ए-तोयबाके सात लोग है, हम सब पाकिस्तानसे आये है, लेकिन मेरा जमीर जाग गया है, मै उनमेसे बाहर निकल आया हूँ, अभीभी ६ लोग वहां है, पुणे रेल्वेस्टेशन, फिनिक्स मॉल
पुणे : ‘हम लष्कर-ए-तोयबाके सात लोग है, हम सब पाकिस्तानसे आये है, लेकिन मेरा जमीर जाग गया है, मै उनमेसे बाहर निकल आया हूँ, अभीभी ६ लोग वहां है, पुणे रेल्वेस्टेशन, फिनिक्स मॉल, हॉटेल हॉलिडे इन, मुंबई विमानतळ और कुछ एअरपोर्ट उडानेवाले है. बचा सकते हो तो बचाओ.’ असा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाल्यावर पोलिसांची सुरू होते एकच धावाधाव. सर्व ठिकाणांवर ‘अलर्ट’ दिला जातो. पोलिसांकडून फोन करणाऱ्याचा शोध सुरू केला जातो. काही तासांतच गुन्हे शाखेचे पुणे दहशतवादविरोधी पथक त्याला पुण्यातूनच ताब्यात घेते; परंतु आरोपीने केलेला हा सर्व खोडसाळपणा असल्याचे लक्षात येते आणि पोलीस सुटकेचा नि:श्वास टाकतात.
संजीवकुमार नकुल मिश्रा (वय ३९, रा. भुवनेश्वर, खुर्दा, ओडिशा) याला अटक करण्यात आली
आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा हा मूळचा ओडिशाचा रहिवासी असून, तो पुण्यामध्ये राहण्यास आहे.
कात्रज येथील त्रिमूर्ती पॅराडाइज लॉजवर दोन दिवसांपासून राहण्यास होता. त्याचा कार्टून अॅनिमेशन आर्टिस्टचा व्यवसाय आहे. तो सहा महिन्यांपूर्वी पुण्यात आला आहे. यापूर्वी तो वडगाव, धायरीमध्ये राहण्यास होता. सोमवारी त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून देशात दहशतवादी घुसल्याचे सांगत अनेक ठिकाणे उडवून देणार असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार पोलिसांनी सर्व ठिकाणी सुरक्षा कडक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. समांतर त्याचा तपासही सुरू करण्यात आला होता. त्याला पकडल्यानंतर त्याने केवळ पोलिसांवरच्या रागामधून हे कृत्य केल्याचे समोर आले. त्याला सिगारेट, दारू, चरस, गांजा अशी अनेक प्रकारची व्यसने आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ, उपनिरीक्षक दत्तात्रय कोल्हे, सहायक फौजदार दत्तात्रय गरूड, उदय मोरे, राजाभाऊ बांबुरे, कर्मचारी दिनेश गडांकुश, शरद देडगे, घोरपडे यांच्या पथकाने केली.