पुण्यात तरुणाने घेतला गळफास; पोलिसांच्या तत्परतेने वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 01:39 PM2021-11-07T13:39:34+5:302021-11-07T13:39:52+5:30
पोलिसांना कॉलवरून तरुणाने फास घेतल्याचे कळताच तातडीने घेतली धाव
धनकवडी : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोलिस नियंत्रण कक्षातून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या बीट मार्शलना एका तरुणाने गळफास घेतल्याबाबत कॉल आला होता. तातडीने पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर आर्थिक विवंचनेतून एका व्यक्तीने काही मिनिटांपूर्वीच गळफास घेतल्याचे दिसले. पोलिस तत्काळ घरातील पंखाला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या त्या तरुणाला खाली उतरून १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवले. अखेर पोलिसांच्या प्रयत्नामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस नाईक अमर भोसले व पोलीस नाईक दिगंबर भोगन हे गुरूवारी रात्रगस्तीवर होते. त्या वेळी पोलिस नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीद्वारे एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर दोघेही काही मिनिटांतच दत्तनगर जांभूळवाडी मार्गावरील सिद्धीविनायक सोसायटी येथे दाखल झाले. तेथे ३२ वर्षांच्या एका तरुणाने गळफास घेतला होता. पोलीस नाईक अमर भोसले व पोलीस नाईक दिगंबर भोगन यांनी आतून बंद असलेला दरवाजा धक्के मारून उघडला.
त्या दोघांनी तरुणाच्या गळ्यातील फास काढून तरुणाला खाली उतरून घेतले. त्याचवेळी १०८ रुग्णवाहिकेस दूरध्वनी करून बोलावून घेतले. रुग्णवाहिका वेळेत आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयामध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. थोड्या वेळाने तो तरुण शुद्धीवर आला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीयही सुखावले.