तरुणीचे बनावट Instagram अकाऊंट तयार करून तिच्याच नातेवाईकांना पाठवले आक्षेपार्ह मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:25 PM2022-02-22T15:25:47+5:302022-02-22T15:34:56+5:30
हा प्रकार ९ व १० फेब्रुवारी रोजी घडला होता....
पुणे : तरुणीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या नातेवाईकांना आक्षेपार्ह मेसेज येत होते. त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ लागले. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात या तरुणीच्या कंपनीतील तरुणाने हा सर्व प्रकार केल्याचे उघड झाले. अलंकार पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. जयमीन रितेश चावडा (वय २३, रा. बेलकेनगर, कोथरुड) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका कंपनीत काम करत आहे. तिच्या कंपनीत काम करणारा जयमीन चावडा याने इंस्टाग्रामवर फिर्यादीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले. लैंगिक उद्देशाने फिर्यादीचा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठलाग करुन तिची बदनामी होईल, अशा प्रकारचे अश्लिल व आक्षेपार्ह मेसेज फिर्यादीच्या नातेवाईकांना पाठवून फिर्यादीचा विनयभंग केला. हा प्रकार ९ व १० फेब्रुवारी रोजी घडला होता.
फिर्यादीला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्याचा तपास केल्यावर हा सर्व प्रकार त्यांच्याच कंपनीत काम करीत असलेला जयमीन चावडा करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.