Pune Crime| भाजीचा स्टॉल लावण्यावरून शहरात तरुणावर कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 02:31 PM2022-02-15T14:31:04+5:302022-02-15T14:33:00+5:30
डोक्यात वार करीत असताना फिर्यादीने हातमध्ये घातला असता हाताच्या बोटावर कोयता लागून तो जखमी झाला..
पुणे : फुटपाथवर भाजीचा स्टॉल लावण्यावरून जागेच्या वादातून मायलेकाने एका तरुणावर कोयत्याने व चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी शिवम दत्तात्रय जगदाळे (वय ३०, रा. साईनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सद्दाम मोईनुद्दीन शेख (वय २४) आणि शायनाबानू मोईनुद्दीन शेख (वय ५०, रा. अप्पर बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील शांतीनगर सोसायटीच्या मेनगेटसमोरील फुटपाथवर रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.
शिवम जगदाळे व आरोपी यांच्यात फुटपाथवर भाजीचा स्टॉल लावण्याकरिता जागेवरुन वाद झाला. शायनाबानू हिने फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. सद्दाम हा हातात कोयत्या घेऊन आला. फिर्यादीच्या स्टॉलला लाथ मारून "इधर तू कैसे धंदा करता मै तेरे को अभी इधरही काट डालता हूॅ" असे म्हणून त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीस मारू लागला. त्यात फिर्यादीच्या डाव्या पायावर, कमरेवर जखमा झाल्या.
डोक्यात वार करीत असताना फिर्यादीने हातमध्ये घातला असता हाताच्या बोटावर कोयता लागून तो जखमी झाला. शायनाबानू हिने भाजी कापण्याच्या चाकूने फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन शिवीगाळ केली. ते रिक्षातून पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.