Pune | गाडी लावण्याच्या वादातून तरुणाच्या डोक्यात वार; दुकानात शिरून टोळक्याने केली तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 07:16 PM2023-03-25T19:16:56+5:302023-03-25T19:20:01+5:30
दुकानात शिरून सामानाची तोडफोड केल्याचा प्रकार...
पुणे : सोसायटीच्या मेन गेटसमोर गाडी लावण्यावरून झालेल्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुकानात शिरून सामानाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी महंम्मद जुबेर मेहंदी हसन शेख (वय २७, रा. कोंढवा) याने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शादाब शाहीद शेख (वय २६, रा. तांबोळी गल्ली, डायस प्लॉट, गुलटेकडी) याला अटक केली आहे. त्याच्या ६ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नाना पेठेतील एसएसकार डेकोर येथे २३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महंम्मद शेख हा एसएसकार डेकोर येथे कामगार आहे. त्यांच्या दुकानाच्या शेजारील रुबी मोटर्समध्ये शादाब शेख हा कामगार आहे. सोसायटीच्या मेन गेटसमोर गाडी लावण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. तो राग मनात ठेवून शादाबच्या सांगण्यावरून त्याचे ६ साथीदार तेथे आले. त्यांनी फिर्यादीच्या दुकानात येऊन कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार केले. फिर्यादी यांनी वार हुकवून तो पळून जाऊन जवळच आडोशाल लपून बसला. तेव्हा या टोळक्याने दुकानात घुसून दुकानातील सामानाची तोडफोड करून ४० हजार रुपयांचे नुकसान केले. दुकानाचे बाहेर येऊन हातातील हत्यार हवेत फिरवून तेथे थांबलेल्या लोकांवर उगारून जोरजोरात आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. सहायक पोलिस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.