चहाच्या गाड्यावर आजीला मदत करणाऱ्या युवकाची ‘यूपीएससी’त बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:56+5:302021-09-26T04:11:56+5:30
याआधी अल्ताफ हे २०१५ साली यूपीएससीची परीक्षा पास होऊन केंद्रीय गृहखात्यात डीवायएसपी पदावर रुजू झाले होते. सुरुवातीला उत्तर प्रदेशमधील ...
याआधी अल्ताफ हे २०१५ साली यूपीएससीची परीक्षा पास होऊन केंद्रीय गृहखात्यात डीवायएसपी पदावर रुजू झाले होते. सुरुवातीला उत्तर प्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यात ते कार्यरत होते. त्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये त्यांची बदली उस्मानाबाद येथे झाली होती. वयाच्या २२ व्या वर्षी अल्ताब हे पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा पास झाले. त्यानंतर नोकरी करत आता पुन्हा एकदा आयपीएस पदासाठी त्यांची निवड झाली आहे. अल्ताफ शेख हे एका सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या वडिलांचा भवानीनगर येथे गॅरेजचा व्यवसाय होता, तसेच शेख यांच्या आजीचा येथे चहा आणि भजीचा गाडा होता. त्यावर काम करून ते आजीला मदत करीत असत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेख यांनी मिळविलेले यश कौतुकाचा विषय ठरला आहे.
ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत राष्ट्रवादी करिअर अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. या अकॅडमीत शेख यांनी करिअरचे धडे गिरविल्याचे येथील प्रशिक्षक समीर मुलाणी यांनी सांगितले.
अल्ताफ शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, केवळ भाषण ऐकून या क्षेत्रात येऊ नका. या क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या क्षेत्राला वेळ देताना पर्यायी व्यवस्थादेखील तयार ठेवा. त्यातून बाहेर कधी पडणार, याचादेखील विचार करा, असे शेख म्हणाले.
फोटो : अल्ताफ शेख
२५०९२०२१बारामती ०९