तरुणांनी आरोग्य तपासणी गांभीर्याने घेणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:13 AM2021-02-25T04:13:50+5:302021-02-25T04:13:50+5:30
डॉक्टरांचा सल्ला : लवकर निदान, लवकर उपचार पुणे : जीवनशैलीशी संबंधित आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आहार आणि व्यायाम ...
डॉक्टरांचा सल्ला : लवकर निदान, लवकर उपचार
पुणे : जीवनशैलीशी संबंधित आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आहार आणि व्यायाम यामध्ये नसलेली सुसूत्रता, व्यसनाधीनता, ताणतणाव यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. आजार होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी, आजारांचे लवकर निदान आणि उपचार यासाठी नियमित तपासण्यांवर भर देणे आवश्यक आहे.
३० ते ४० वर्षे वयोगटात धोक्याची घंटा देणारे आजार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळातच या समस्या रोखल्यास पुढे होणारे गंभीर परिणाम रोखता येऊ शकतात. नियमित आरोग्य तपासणी केल्यास मधुमेह, उच्चरक्तदाब, अपचन, हृदयाचे आजार, मूत्रपिंडविकार आदी आजारांची धोक्याची घंटा वेळीच ओळखली तर वेळीच जीवनशैलीत बदल करून आणि योग्य उपचार घेतल्यास, तरुण पिढीदेखील दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जनरल फिजिशियन डॉ. मुकेश बुधवानी म्हणाले, ‘बदलती जीवनशैली ही आरोग्याच्या विविध समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे. ३० ते ४० वर्षे वयोगटात आढळणा-या आजारांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा, फुफ्फुसाचा रोग, उच्च रक्तदाब, हायपरलिपिडेमिया, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा दीर्घकालीन धोका, चयापचय विकार आणि यकृत रोग यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळातच या आरोग्यविषयक समस्या गांभीर्याने घेत त्यानुसार उपचार केल्यास भविष्यातील गुंतागुत रोखता येऊ शकते. थायरॉइड, यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्या, मधुमेह, उच्च रक्तदाब, तणाव, चिंता, नैराश्य, अपचन आणि मायग्रेन या अनुवंशिक आरोग्याच्या समस्या आहेत. तरुण स्त्रियांमध्ये थायरॉइड विकार सामान्य आहे आणि त्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. नियमित आरोग्य तपासणीद्वारे तीव्र आजारांचे वेळीच निदान करणे शक्य होते.’
---
कोणत्या चाचण्या गरजेच्या?
मधुमेह तपासणी, वजन, कोलेस्टेराॅलची पातळी, यूरिक अॅसिडस्, हिमोग्राम, मूत्रपिंड आणि यकृत कार्य चाचणी, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाइल, सोनोग्राफी, लठ्ठपणा आणि चरबीचे प्रमाण याकरिता रक्त तपासणी.
स्त्रियांनी तरुण वयातच मॅमोग्राम आणि पॅप स्मिअर चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि डी आणि कॅल्शियमसारख्या कमतरतेचे मूल्यांकन केले पाहिजे जेणेकरून संधिवात, स्मृतिभ्रंश, एकाग्रता आणि स्मरणशक्ती यासारख्या दीर्घकालीन समस्या टाळता येतील.
---
काय काळजी घ्यावी?
योगा, एरोबिक्स, व्यायामशाळा, पोहणे, सूर्यनमस्कार, जॉगिंग, सायकलिंग, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि चालणे असे व्यायाम प्रकार निवडणे योग्य ठरेल. ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन, मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन करणे टाळा.