लैंगिक अत्याचाराच्या विराेधात पुण्यातील तरुण - तरुणी म्हणतायेत ''वी टुगेदर''
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 05:39 PM2019-01-27T17:39:41+5:302019-01-27T17:41:31+5:30
वी टू या समितीकडून आज लैंगिक अत्याचार विराेधी कायद्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते.
पुणे : 2017 हे वर्ष महत्त्वाचे ठरले ते मी टू या चळवळीमुळे. अमेरिकेपासून सुरु झालेल्या या चळवळीने भारतातील अनेक नामवंत लाेकांचे खरे चेहरे जगासमाेर आणले. तरुणी, अभिनेत्री, पत्रकार महिला या समाेर येऊन आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फाेडू लागल्या. मी टू या चळवळीने समाजाला ढवळून काढले हाेते. तसेच स्त्रीयांवर हाेणाऱ्या अत्याचाराबाबत जागृत केले हाेते. परंतु प्रत्येक मुलीकडे समाेर येऊन आपल्यावर झालेला अत्याचार जाहीर सांगण्याची हिंम्मत नसते. अशा तरुणींसाठी पुण्यातील तरुणांनीच वी टुगेदर ही समिती स्थापन केली. या समितीमार्फत मुलींचे समुपदेशन आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडण्यासाठी त्यांना हिंम्मत देण्याचे व त्यांना कायदेशीर मदत मिळवून देण्याचे काम करण्यात आले. या समितीकडून आज लैंगिक अत्याचार विराेधी कायद्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते.
पुण्यातील कायद्याचे शिक्षण व पत्रकारितेचे शिक्षण घेणारे तरुण - तरुणी एकत्र येत त्यांनी वी टु ही समिती स्थापन केली. या समितीतर्फे आज लैंगिक अत्याचार विराेधी कायदा याची माहिती करुन देण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयाेजन केले हाेते. यात अनेक तरुणी तसेच तरुणांनी देखील सहभाग घेतला. या कार्यशाळेत बोलताना विधी अभ्यासक अर्चना मोरे म्हणाल्या की, "दिवसेंदिवस स्त्रियांवर वाढत असलेले अत्याचार ही चिंतेची बाब आहे. या लैंगिक अत्याचाराविरोधात फक्त संवेदंशिलता व हळहळ व्यक्त न करता कृतीशिलतेने काम करणे गरजेचे आहे. वी टू समितीने आयोजित केलेल्या कार्यशाळेतुन कृतीशिलतेचा मार्ग मिळेल." आता, या मिळालेल्या कृतीशिल मार्गातुन लैंगिक अत्याचाराविरोधात एकजूटीने लढा.
लैंगिक अत्याचाराविषयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी 'झिरो टॉलरंस' असे वातावरण समाजात निर्माण करणे गरजेचे आहे. कायदेविषयक जनजागृती व सुयोग्य वापर यातून सामाजिक मानसिकता बदलेल असा आशावाद स्त्रीवादी कार्यकर्त्या अनिता पगारे यांनी व्यक्त केला. घरगुती हिंसाचार विरोधी कायदा, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार, पॉक्सो, भारतीय दंड विधान संहिता इत्यादी कायद्यातील तरतूदी आणि यासंदर्भात करावयाचे उपाययोजन यांवर या कार्यशाळेतुन सहभागींना मार्गदर्शन मिळाले.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी वी टू समितीचे शर्मिला येवले,कल्याणी माणगावे,दीपक चटप, मयूर ढुमणे, स्वाती कांबळे, घनश्याम येनगे, संदीप आखाडे आदींनी अथक परिश्रम घेतले.