'तरुणांनी वाचन कराव, देशाचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करावेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 12:29 AM2019-02-21T00:29:22+5:302019-02-21T00:30:08+5:30

विश्वास नांगरे-पाटील : अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद

'Young people should read and try to make the country's name big' | 'तरुणांनी वाचन कराव, देशाचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करावेत'

'तरुणांनी वाचन कराव, देशाचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करावेत'

googlenewsNext

मंचर : सीमेवर जवान शहीद होत असताना आपण सेल्फी, व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकच्या बाहेर निघण्यास तयार नाही. तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा व ताकद आहे. या ऊर्जेचा वापर देशाचे, समाजाचे नाव मोठे होण्यासाठी करा, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.

मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात नांगरे-पाटील यांंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नांगरे-पाटील यांचे व्यासपीठावर आगमन होताच विद्यार्थ्यांनी देशप्रेमाच्या घोषणा दिल्या. नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाले. नंतर झालेल्या चकमकीत जवानांना वीरमरण आले. त्यामुळे देशात प्रचंड संताप आहे. समाजात जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्याचा अतिरेक्यांचा हेतू आहे. मात्र, आपल्याला हा तणाव निर्माण होऊ द्यायचा नाही. आम्ही सर्व जण एकसंध आहोत, हा संदेश आपल्याला द्यायचा आहे. देशाच्या सीमेवर जवान शहीद होत असताना आपण सेल्फी, व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकच्या बाहेर निघण्यास तयार नाही. तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा व ताकद आहे, असे सांगून नांगरे-पाटील म्हणाले, की या ऊर्जेचा वापर समाज व देशाचे नाव मोठे करण्यासाठी करा. तरुणांनी रोजच्या सवयी बदलून वाचन वाढविले पाहिजे. प्राचार्य एन. एस. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, प्रा. राजाराम बाणखेले, आशिष पुंगलिया, प्रा. कैलास एरंडे, प्रा. सोमनाथ वामन आदी या वेळी उपस्थित होते.

परमेश्वराने आयुष्य दिले आहे, त्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवा. माणसाला कधी छोटे-कधी मोठे, कधी मृदू-कधी कडक व्हायचे ते कळले पाहिजे. एकमेकांचा द्वेष, तिरस्कार आयुष्यात करू नका. तरुणांनी सैन्यात भरती व्हावे, असे आवाहन करून ते म्हणाले, की येथे आल्यानंतर मला कॉलेजचे दिवस आठवले. पुन्हा विद्यार्थी बनावेसे वाटते. आपल्या फिटनेसचा राज सांगून नांगरे-पाटील म्हणाले, की विद्यार्थ्यांनी अभ्यास तसेच फिटनेसवर लक्ष केंद्रित करावे.
 

Web Title: 'Young people should read and try to make the country's name big'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.