व्यवस्था बदलण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा - बाबा आढाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:23 AM2018-05-20T01:23:14+5:302018-05-20T01:23:14+5:30
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुणे ते मुंबई लाँग मार्चला सुरुवात
पुणे : तरूणांना या देशात भवितव्य नसेल तर राष्टÑच उभे राहू शकणार नाही. या देशात तरूणांच्या भविष्यावर जुगार खेळला जातोय. व्यवस्था बदलण्यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
सरकारी नोकर भरती भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या पुणे ते मुंबई लाँगमार्च या लाँगमार्चला डेक्क न नदीपात्रातून शनिवारी सुरूवात झाली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, सुभाष वारे, स्मिता पानसरे यांनी लाँगमार्चला पाठिंबा दिला. आयोजक योगेश जाधव, गिरीश फोंडे, अमोल हिपर्गे, पंकज चव्हाण, महेश बढे यावेळी उपस्थित होते.
वारे म्हणाले, सरकारचे चुकलेले आर्थिक धोरण हे बेरोजगारीचे कारण आहे. त्यामुळे याविरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार लढा देण्याची आवश्यकता आहे. पानसरे म्हणाल्या, जे सरकार मुलभूत हक्कांची पूर्तता करू शकत नसेल तर ते सरकार खाली खेचायला हवे. स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार टाळावेत. जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची घोषणा शासनाने केली आहे, त्याची अंमलबजावणी करावी. खाजगी कंपनीला नोकर भरतीची कामे कंत्राटी पध्दतीने देऊ नये.
महापोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा आॅफलाईन पद्धतीने एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात. नोकरी भरती घोटाळयांची न्यायालयीन चौकशी करावी खोटे खेळाडू, जात, अपंग व टाईपिंग प्रमाणपत्र देऊन शासकिय सेवेत आलेल्यांना बडतर्फ करावे, राज्य शासनामधील १ लाख ७७ हजार रिक्त जागा तसेच पोलिसांच्या ५० हजार रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात आदी मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.